Sat, Jul 04, 2020 20:46होमपेज › Sports › विल्यमसनच्या झुंजार फलंदाजीने न्यूझीलंडला आघाडी

विल्यमसनच्या झुंजार फलंदाजीने न्यूझीलंडला आघाडी

Last Updated: Feb 24 2020 1:29AM
वेलिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

कर्णधार केन विल्यमसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी 5 बाद 216 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 51 धावांची आघाडी घेतली आहे. पण, ही आघाडी मिळवून देणाऱ्या विल्यमसनला त्याचे शतक मात्र पूर्ण करता आले नाही. विल्यमसनने 89 धावांची खेळी केली. त्याने रॉस टेलर बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी रचली. टेलरने 44 धावा केल्या. भारताकडून इशांत शर्माने 3 तर मोहम्मद शमी, आर. अश्विनने प्रत्येकी एक 1 विकेट घतली.

न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावात संपवला. त्यांनतर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम (11) स्वस्तात माघारी परतल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम ब्लंडेल यांनी 47 धावांची भागिदारी रचली. पण, इशांत शर्माने 30 धावांवर खेळणाऱ्या ब्लंडेलचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. 

ब्लंडेल बाद झाल्यानंतर आपला 100 वा कसोटी सामना खेळणारा रॉस टेलर फलंदाजीला आला. त्याने आणि कर्णधार विल्यमसनने न्यूझीलंडला शंभरी पार करुन दिली. दरम्यान, केन विल्यमसन आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने चहापानानंतर चौकार मारत दिमाखात आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, रॉस टेलरही सेट झाला होता. तोही चाळीशीत पोहचला, विल्यमसन आणि टेलरने न्यूझीलंडाला 150 च्या पार पोहचवले. अर्धशतकानंतर केन विल्यमसनने आपली धावगती वाढवली. त्यामुळे 51 षटकानंतर न्यूझीलंडने भारताची पहिल्या डावातील 165 ही धावसंख्या पार करत आघाडी घेण्यास सुरुवात केली. 

ही जोडी भारताला भारी पडणार असे वाटत असतानाच इशांत शर्माने पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिले. त्याने 44 धावांवर फलंदाजी करणाऱ्या रॉस टेलरला बाद करत ही जोडी फोडली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी रचली. ही जोडी फुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करण्यास सुरुवात केली त्यामुळे न्यूझीलंडची धावगती मंदावली. दरम्यान, केन विल्यमसन हळूहळू आपल्या शतकाकडे कूच करत होता. तर हेन्री निकोल्सने 50 चेंडू खेळूनही 10 धावा करता आल्या नव्हत्या. पण, 89 धावांवर पोहचलेल्या विल्यमसनला महोम्मद शमीने जडेजाकरवी झेलबाद करत भारताला मोठा दिलासा दिला. 

त्यानंतर संथ फलंदाजी करणाऱ्या निकोल्सने न्यूझीलंडला 200 चा टप्पा पार करुन दिली. पण, अश्विनने त्याला 17 धावांवर बाद करत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. त्यानंतर मंद प्रकाशामुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवला. खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडच्या 5 बाद 216 धावा झाल्या होत्या, बीजे वॉटलिंग 14 तर ग्रँडहोमी 4 धावांवर नाबाद होते. दिवसअखेर न्यूझीलंडकडे 51 धावांची आघाडी आहे. 

तत्पूर्वी, पहिल्या दिवशीच्या 122 धावांपासून पुढे खेळताना भारताला दुसऱ्या दिवशी 165 धावांपर्यंतच मजल मारता आली. काल 10 धावांवर नाबाद असलेला पंत त्यामध्ये 9 धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर आलेला आर. अश्विन भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये पोहचला. त्यानंतर अजिंक्य रहाणेचीही 46 धावांची झुंज टिम साऊदीने संपवत भारताला 143 धावांवर आठवा धक्का दिला. त्यामुळे भारताचा पहिला डाव 150 च्या आतच गुंडाळणार असे वाटत होते पण, मोहम्मद शमीने 21 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 165 धावांपर्यंत पोहचवले.  

न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या कायेल जेमीसनने 16 षटकातील 3 षटके निर्धाव टाकत 39 धावा देत 4 विकेट मिळवल्या. तर अनुभवी टिम साउदीनेही 20.1 षटकातील 5 षटकते निर्धाव टाकत 49 धावा देत भारताचे 4 फलंदाज टिपले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या ट्रेट बोल्टने 1 विकेट घेतली. तर ऋषभ पंत आत्महत्या करत धावबाद झाला होता.