Mon, Apr 06, 2020 10:07होमपेज › Sports › NZvsIND : टी-२० च्या इतिहासात 'असे' पहिल्यांदाच घडले!

टी-२० च्या इतिहासात 'असे' पहिल्यांदाच घडले!

Last Updated: Jan 24 2020 7:08PM
ऑकलंड : पुढारी ऑनलाईन 

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिला टी-२० सामना भारताने ६ विकेट राखून जिंकत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने भारतासमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये टेलर, मुनरो आणि विल्यम्सनच्या अर्धशतकांचा वाटा मोलाचा होता. त्यानंतर भारताने हे टार्गेट १९ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडूनही श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे टी-२० सामन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात ५ अर्धशतके ठोकण्यात आली. 

अधिक वाचा : NZvsIND : अय्यरचा फिनिशिंग टच; भारताची विजयी सलामी

न्यूझीलंडने ऑकलंडच्या एडन पार्कच्या छोट्या बाऊंडरीचा फायदा उचलत २०३ धावांचा डोंगर रचला. न्यूझीलंडकडून मुनरो, टेलर आणि विल्यम्सनने अर्धशतके ठोकली. भारताकडूनही या खेळींना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारताकडून श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने दमादार अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार विराटची अर्धशतकी खेळी अवघ्या ५ धावांनी हुकली. या अर्धशतकांच्या चुरशीत टी-२० इतिहासातील एक विक्रम झाला. या सामन्यात एकूण ५ अर्धशतके ठोकली गेली. एका टी-२० सामन्यात ५ अर्धशतकी खेळी होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

याचबरोबर भारताने टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा २०० च्या वरचे टार्गेट चेस करण्याचा विक्रमही कायम राखला. भारताने आतापर्यंत ४ वेळा २०० च्या वरचे टार्गेट चेस केले. ऑस्ट्रेलियाने २ वेळा तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि कतारने आतापर्यंत १ वेळा २०० पारचे टार्गेट चेस केले. भारताने टी-२० मध्ये २०१९ ला वेस्ट इंडिजने ठेवलेले २०८ धावांचे टार्गेट चेस केले होते. तर २००९ ला श्रीलंकेविरुद्ध २०७ धावा चेस केल्या होत्या. आजच्या सामन्यात भारताने २०४ धावा चेस केल्या आहेत. तर २०१३ ला राजकोटवर ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केले होता.