Fri, Sep 25, 2020 15:32होमपेज › Sports › नैकता बेन्स, इमा राडकानू उपांत्य फेरीत

नैकता बेन्स, इमा राडकानू उपांत्य फेरीत

Last Updated: Dec 13 2019 9:20PM
पुणे : प्रतिनिधी

19 व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25 हजार डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स, इमा राडकानू, रशियाच्या ओल्गा दोरोशिना, थायलंडच्या पेंगतार्न प्लिपूच यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.   

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेन्स हिने थायलंडच्या पुनिन कोवा पिटुक्टेडचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. 1 तास चाललेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये नैकताने सुरेख सुरुवात करीत नेट जवळून आक्रमक खेळ केला.  या सेटमध्ये पुनिनची नैकताने तिसर्‍या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी मिळवली. पिछाडीवर असलेल्या पुनिनला दुसर्‍या सेटमध्येदेखील नैकताने कमबॅक करण्याची संधी दिली नाही. दुसर्‍या सेटमध्ये सुरुवातीला दोघींनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर नैकताने आपली आक्रमक पवित्रा स्वीकारत चौथ्या व सहाव्या गेमला पुनिनची सर्व्हिस रोखली व 6-1 अशा सारख्याच फरकाने जिंकून विजय मिळवला. क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत बेलारूसच्या शालिमार तालबीचा 6-1, 5-7, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. 

थायलंडच्या आठव्या मानांकित पेंगतार्न प्लिपुच हिने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलिसिया स्मिथचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडीत काढले. रशियाच्या ओल्गा दोरोशिना हिने   पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या सातो नाहो 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 

दुहेरीत उपांत्य फेरीत रशियाच्या  दारिया मिशीना व ऍना मोरगिना या जोडीने चौथ्या मानांकित चीनच्या जिया-की कांग व थायलंडच्या पेंगतारण प्लिपुच यांचा  6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसर्‍या उपांत्य फेरीच्या लढतीत नॉर्वेच्या उलरीके एकेरी व रशियाच्या याशीना एकतेरिना यांनी कोरियाच्या  किम दबीन व किम ना री यांचा 6-4, 2-6, 10-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 
 

 "