Sun, Jan 24, 2021 21:06होमपेज › Sports › #InternationalMensDay रैना म्हणतो, महामारीने पुरुषांच्या जबाबदाऱ्या बदलल्या! 

#InternationalMensDay रैना म्हणतो, महामारीने पुरुषांच्या जबाबदाऱ्या बदलल्या! 

Last Updated: Nov 19 2020 10:08AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे औचित्य साधून भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने कोरोना महामारीने पुरुषांच्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकता कशा बदलल्या हे सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने महारामारीपूर्वी पुरुषांनी आपल्या कुटुंबासोबत फार काळ घालवलाच नव्हता. पण, या महामारीने समाजातील पुरुषांना ही संधी दिली असल्याचे सांगितले. 

रैना म्हणाला 'कोरोना महामारीने बऱ्याच पुरुषांचे आयुष्य आणि जबाबदाऱ्या बदलून गेल्या आहेत. पुरुषांनी यापूर्वी कुटुंबासोबत इतका वेळ कधीही घालवला नव्हता. महामारीमुळे प्रत्येकाने आपला जास्तीजास्त वेळी घरात घालवला. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासोबत विशेषतः मुलांसोबत जास्त वेळ घालवता आला. पुरुषांनी किचनमध्येही आपला हात आजमावला, त्यांनी वेळेचे नियोजन केले, मुलांच्या टीव्हीच्या आणि व्हिडिओ गेम्सच्या वेळा  सांभाळल्या, घरातील छोट्या भावंडांची छोटीमोठी भांडणे सोडवली.' 

रैना पुढे म्हणाला की 'यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त आम्हाला पुरुष म्हणून एक सक्रीय पार्टनर म्हणून स्वतः ला पाहिले पाहिजे. तो फक्त मुलांच्या पालन पोषणात मदत करणारा मदतनीस न होता समान जबाबदारी स्विकारणारा असला पाहिजे. आज चांगला पालक होण्यासाठी आपल्याला चांगले वातावरण निर्माण करावे लागेल. सध्याचे युवा पालक या बदलासाठी जास्त सकारात्मक आहेत. सध्याचा युवा पालक विशेष करुन वडिलांच्या भुमिकेतील तरुण आपल्या सर्वसाधारण वागणुकीत बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. तो मुलांच्या संगोपणात आपला अधिक वाटा उचलण्यास तयार आहे.'

३३ वर्षाच्या रैनाने गेल्या काही काळात पुरुषांचा रोलही बदलल्याचे सांगतो. तो आता फक्त आपल्या घरासाठी पगार कमवणारा राहिलेला नाही. रैना म्हणतो 'सध्या आपण असे पुरुष बघतोय जे त्यांच्या कामाबरोबरच यापूर्वी न घेतलेल्या जबाबदाऱ्या स्विकारण्यास शिकण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या बदलत आहेत. आता आम्ही फक्त घरासाठी लागणारा पैसा करमवणारे राहिलो नसुन एक चांगला जोडीदार होण्यासाठीही भक्कम योगदान देत आहोत. 

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा १९ नोव्हेंबरला साजरा केले जातो. यावेळी देशाच्या जडणघडणीत, समाजासाठी, कुटुंबीयांसाठी, आपल्या पार्टनरसाठी आणि आपल्या पाल्यासाठी पुरुषांनी दिलेल्या योगदानाचा उत्सव साजरा केला जातो.