Fri, Apr 23, 2021 14:52
कोव्हिडमुळे भारतातील टी-२० वर्ल्डकप धोक्यात?

Last Updated: Apr 07 2021 10:18PM

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. अशा स्थितीत टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनात समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या स्पर्धेच्या आयोजनात आपल्याकडे बॅकअप प्लॅन आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

आयसीसीचे अंतरिम सीईओ जियॉफ एलार्डिस यांनी बुधवारी सांगितले की, भारतात यावर्षी होणार्‍या  टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपल्याकडे बॅकअप प्लॅन आहे. मात्र, हा प्लॅन योग्यवेळी अंमलात आणण्याचा विचार केला जाईल. सध्या तरी आम्ही या प्लॅनवरील कामास सुरुवात केलेली नाही. तसेच निर्धारित कार्यक्रमानुसार आम्ही सध्या भारतात ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी करत आहोत.

एलार्डिस यांनी पुढे सांगितले की, टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीचा आयसीसीजवळ आसलेला पर्याय अंमलात आणण्यासाठी सध्या भरपूर वेळ आहे. सध्या तरी आमचे लक्ष 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथम्पटन येथे सुरू होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर आहे. मात्र, त्यानंतर होणार्‍या टी-20 वर्ल्डकपच्या आयोजनासाठी बॅकअप प्लॅन म्हणून संयुक्त अरब अमिरात आहे. जेथे गतसाली आयपीएल 2020 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.