पुढारी ऑनलाईन डेस्क
इंडियन प्रिमियर लीग २०२०च्या हंगामासाठी कोलकात्यात १९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावात जगभरातील ९७१ खेळाडू आपल्या पदरात जास्तीजास्त दान पाडून घेण्याच्या प्रयत्नात असतील. २०२०च्या आयपीएल हंगामासाठी बऱ्याच संघांनी आधीच काही खेळाडू रिटेन तर काही खेळाडू खरेदी केले आहेत. आता १९ डिसेंबरला या संघांना आपल्या संघासाठी उपयुक्त खेळाडू घेऊन आपला संघ परिपूर्ण करण्याची संधी आहे. या लिलावासाठी जगभरातील बऱ्याच दिग्गजांनी आपली बेस प्राईस जाहीर केली आहे.
एका क्रीडा वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथाप्पाला रिलीज केले आहे. त्याने २०२० च्या हंगामासाठी आपली बेस प्राईस १.५ कोटी ठेवली आहे. माहितीनुसार २०२० च्या आयपीएल हंगामातील एका भारतीय खेळाडूने ठेवलेली ही सर्वात जास्त बेस प्राईस आहे. रॉबिन बरोबरच शॉन मार्श, केन रिचर्डसन, इऑन मॉर्गन, जेसन रॉय, ख्रिस वोक्स आणि डेव्हिड विली यांनीही आपली बेस प्राईस १.५ कोटी ठेवली आहे.
केकेआरकडून धडाकेबाज खेळी करत आलेल्या ख्रिस लिनलाही संघाने रिलीज केले आहे. त्याने आपली बेस प्राईस २ कोटी ठेवली आहे. याचबरोबर कायम जायबंदी होणारा डेल स्टेन, सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल असलेला फास्ट बॉलर पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, जोश हेजलवूड आणि अँजेलो मॅथ्युज यांनीही आपली बेस प्राईस २ कोटी ठेवली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कने यंदाच्या लिलावातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.