Fri, Apr 23, 2021 12:59
IPL FlashBack : आतापर्यंत किती सामने गेले सुपर ओव्हरमध्ये?

Last Updated: Apr 08 2021 4:01PM

पुढारी ऑनलाईन डेस्क 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्‍पर्धा ही त्याच्या पहिल्या सामन्यापासूनच फार रंजक आणि अटीतटीची राहिली आहे. गेल्या दशकभरात 'आयपीएल'ने प्रत्येक हंगामात असे काही सामने दिले आहेत जे सामने पाहताना चाहत्यांनी सर्वोच्च रोमांच अनुभवला आहे. आता आपण अशाच आयपीएलमधील अटीतटीचे पण निकाल लागण्यासाठी सुपर ओव्हर टाकावी लागलेले सामना पाहणार आहोत. 

आयपीएल इतिहासात असे अनेक सामने सुपर ओव्हरमध्ये गेले आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का, सर्वात पहिला सुपर ओव्हर सामना कोणत्या हंगामात आणि कोणत्या संघात झाला आहे?, एकाच हंगामात जास्तीजास्त किती सुपर ओव्हर सामने झाले आहेत? आज आपण याच आयपीएलमधील सुपर ओव्हरच्या इतिहासावर एक नजर टाकणार आहोत. 

२००९ - १

आयपीएल इतिहासात २००९ मध्ये पहिला सुपर ओव्हर सामना झाला होता. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला होता. दोन्ही संघांनी २० षटकात १५० धावा केल्याने सामना टाय झाला होता. केकेआरने ख्रिस गेलच्या ३ चौकारांच्या मदतीने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या होत्या. पण, राजस्थान रॉयल्सच्या युसूफ पठाणने अजंता मेंडिसच्या पहिल्या चार चेंडूत चार चौकार मारत १६ धावा केल्या आणि राजस्थानने सामना जिंकला. 

२०१० - १

त्याच्या पुढच्याच हंगामात म्हणजे २०१० ला पंजाब आणि सीएसके यांच्यातील सामना टाय झाला होता. या सामन्यात दोन्ही संघांनी १३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने १० धावांचे आव्हान ४ चेंडूत पूर्ण केले. 

२०१३ - २ 

त्यानंतर २०११ आणि २०१२ मध्ये एकही सामना टाय झाला नाही. त्यामुळे या सलग दोन हंगामात एकही सुपर ओव्हर झाली नाही. पण, त्यानंतरच्या २०१३ च्या हंगामात चाहत्यांना दोन रोमांचक सुपर ओव्हर सामने पाहण्याची संधी मिळाली. हंगामातील २१ व्या सामन्यात आरसीबी आणि दिल्लीने १५२ धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये आरसीबीसमोर १२ धावांचे आव्हान ठेवले. आरसीबीच्या गेल आणि डिव्हिलियर्स या धडाकेबाज जोडीला पहिल्या चार चेंडूत फक्त ३ धावाच करता आल्या. पण, एबीने अखेरच्या दोन चेंडूत दोन षटकार मारत सामना स्टाईलमध्ये संपवला. 

आरसीबीने सुपर ओव्हर खेळण्याचा थरात याच हंगामात पुन्हा एकदा अनुभवला. त्यांचा आणि हैदराबादचा सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये गेला. पण, यावेळी आरसीबीला हैदराबादने ठेवलेले २० धावांचे आव्हान पेलवले नाही. 

२०१४ - १ 

आयपीएल २०१४ मध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुपर ओव्हरचा सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर जिंकला. 

२०१७ - १ 

त्यानंतर सुपर ओव्हरने पुन्हा एकदा दोन वर्षाचा गॅप घेतला. पुढील सुपर ओव्हर ही २०१७ मध्ये गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. मुंबईच्या जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हरमध्ये टिच्चून मारा केला याच्या जोरावर मुंबईने हा सामना जिंकला. 

२०१९ - २ 

त्यानंतर एका वर्षाच्या गॅपनंतर म्हणजे २०१९ च्या हंगामात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा डबल हेडर पहायला मिळाला. पहिल्या सामन्यात दिल्लीने केकेआरचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. यावेळी दिल्लीच्या कसिगो रबाडाने दमदार गोलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने हैदराबादचा पराभव केला. 

२०२० - ४ 

सुपर ओव्हरच्या बाबतीत २०२० हे वर्ष फारच रंजक आहे. या वर्षात तब्बल चार सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. यातील मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना हा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने विजय मिळवला. याच दिवशी पहिल्यांना केकेआरने हैदराबादवर सुपर ओव्हरमध्येच विजय मिळवला होता. 

२०२० हंगामातील पहिला सुपर ओव्हर सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला होता. हा सामना एबी डिव्हिलियर्समुळे आरसीबीने जिंकला. यानंतर दिल्लीनेही पंजाबविरुद्धचा सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना जिंकला होता. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत १२ सामने सुपर ओव्हरमध्ये गेले आहेत. 

आयपीएल सुपर ओव्हर नियम 

- सुपर ओव्हर ही दुसऱ्या डावनंतर १० मिनिटांनी सुरु होईल. 

- दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करेल. 

- सामन्यातील पंच हे सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी सुपर ओव्हरमध्येही उभे राहतील.

- सुपर ओव्हर ही सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला त्याच खेळपट्टीवर खेळवला जाईल.

- सुपर ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ त्यांचा बॉलिंग एन्ड निवडू शकतो.

- क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा या सामन्याच्या शेवटच्या षटकात जशा होत्या तशाच सुपरओव्हर मध्ये राहतील.

- सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांना तीन फलंदाज (दोन विकेट ) आणि एक गोलंदाज वापरण्याची मुभा असणार आहे. 

- जर सुपर ओव्हरही टाय झाली तर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येतील. पण, हे सर्व निर्धारित वेळेत होईल.