Fri, May 07, 2021 18:33
कोरोनाचे संकट! आयपीएल रद्द झालेली नाही तर...

Last Updated: May 05 2021 10:06AM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आयपीएलवर सुद्धा कोरोनाचे गडद सावट आल्याने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर चाहते काहीसे नाराज झाल्याचे चित्र समोर आले. अनेकांनी सोशल मीडियावर ही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात सूतोवाच केले आहे. 

'आयपीएल रद्द झालेली नाही. ती केवळ पुढे ढकलण्यात आली आहे' असे शुक्ला यांनी स्पष्ट करत आयपीएल प्रेमींना दिलासा दिला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, कोव्हिडची परिस्थिती सुधारेल तेव्हा आयपीएलच्या उर्वरित सामन्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. यासोबत खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा विचार करून आयीपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही शुक्ला यांनी म्हटले आहे. 

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळूर सोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला होता. मंगळवारी हैदराबादच्या वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आयपीएलचे आयोजन करणार्‍या बीसीसीआयचे २००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, यावर्षी भारतात होणारे टी-20 वर्ल्ड कपचे सामनेदेखील रद्द होण्याची शक्यता आहे. जर भारताकडून या स्पर्धेचे यजमानपद काढले गेले तर बीसीसीआयचे यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.