Wed, May 12, 2021 01:22
आयपीएलमध्ये कोरोना! CSK-KKR नंतर आणखी एक टीम आयसोलेट

Last Updated: May 04 2021 10:13AM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुरक्षित काळजी घेऊन सुद्धा आयपीएल स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले आहे आहे.  कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघदेखील आयसोलेट झाला आहे.

बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला विलगीकरणात जाण्याची सूचना केली आहे. एका इंग्रजी वृत्ताच्या माहितीनुसार, बीसीसीआयने डीसीच्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला विलगीकरणात जाण्यास सांगितले आहे, कारण २९ एप्रिलला डीसीने कोलकाताविरुद्ध सामना खेळला होता. दिल्लीचा संघ सध्या अहमदाबाद येथे आहे. 

'आम्ही आमचा मागचा सामना केकेआर विरुद्ध खेळला आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे आणि आता आम्ही सर्व विलगीकरणात आहोत. आम्ही सर्व प्रत्येकाच्या खोलीत आहोत,'' अशी माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिली आहे. 

दुसरीकडे दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे मैदानात काम करणारे ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह आलेले हे कर्मचारी मागचा आठवडाभर मैदानात आले नव्हते.