Fri, May 07, 2021 18:09
IPL 2021 : कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या आयपीएलला मुंबई तारणार?

Last Updated: May 04 2021 8:21PM

पुढारी ऑनलाईन डेस्क 

आयपीएलच्या 'सिक्युर' बायो बबलमध्ये कोरोनाचा अखेर शिरकाव झालाच. कोलकात्याच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाचा लागण झाल्यानंतर कोरोनाने आपले पाय सीएसकेमध्येही पसरले. संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस चालक कोरोबाधित झाले. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलमधील दोन सामने पुढे ढकलून आयपीएल रेटण्याच्या नादात होती. 

पण, सनरायजर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्राही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने बासीसीआयला नमते घ्यावे लागले. आधीच देशभरात कोरोनामुळे स्मशानभूमीत मृतदेहांचा खच पडत असतानाही आयपीएल खेळवण्यात येत असल्यामुळे अनेक स्तरातून रोष व्यक्त होत होता. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएल तात्काळ पुढे ढकलण्यावाचून पर्याय उरला नाही. पण, असे असले तरी ही बीसीसीआय आहे. त्यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आयपीएल यशस्वी करुन दाखवली होती आणि ते दुसऱ्या लाटेतही आयपीएल पूर्णत्वास नेण्याचा अटोकाट प्रयत्न करतील. 

बीसीसीआयने जरी आयपीएल पुढे ढकलली असली तर जाणकारांच्या मते बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल १४ वा हंगाम पूर्ण करण्यावर काम करत आहे. सध्या तरी बीसीसीआय उर्वरित आयपीएल पूर्ण करण्यासाठी तीन शक्यतांवर काम करत आहे असे जाणकारांचे मत आहे. 

आयपीएलला मुंबई तारणार?

कोरोनाने जेव्हा आयपीएलच्या बायो सिक्युर बबलमध्ये प्रवेश केला त्यावेळीच बीसीसीआयने काऊंटर प्लॅनिंग करत इथून पुढचे आयपीएलचे सर्व सामने हे मुंबईत खेळवण्याचा घाट घातला होता. या प्लॅन नुसार मुंबईतील तीन स्टेडियमवर उरलेले आयपीएलचे सामने खेळवून स्पर्धा पूर्णत्वास नेण्यात येणार होती. पण, कोरोनाने केकेआर, सीएसके पाठापोठ हैदराबाद आणि दिल्ली संघातही शिरकाव केल्याने बीसीसीआयवरचा स्पर्धा पुढे ढकलण्याचा दबाव वाढला आणि स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावी लागली. 

पण, स्पर्धा मुंबईत खेळवण्याचा पर्याय पूर्णपणे बाद झालेला नाही. अजूनही १० दिवसांचा गॅप घेऊन उरलेली स्पर्धा ही मुंबईच्या तीन मैदानादरम्यान बायो सिक्युर बबल तयार करुन पूर्ण करता येऊ शकते. याला महत्वाची कारणे म्हणजे यंदाच्या हंगामातील पहिले सत्र मुंबईत पार पडले आहे आणि तेथे कोणालाही कोरोनाचा बाधा झाली नाही. तसेच सध्या महाराष्ट्रातील आणि मुंबईतील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात येत आहे. पण हा निर्णय घेण्याचे धाडस बीसीसीआय करणार का हा मोठा प्रश्न आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पुढे ढकलत युएईत जून मध्ये आयपीएल 

बीसीसीआयसाठी आयपीएल जूनमध्ये युएईत पूर्ण करणे हा एक उत्तम पर्याय आहे. पण, यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढे ढकलावा लागणार आहे. यासाठी आयसीसीशी सल्लामसलत करावी लागणार आहे आणि हा प्रस्ताव त्यांच्या गळी उतरवावा लागणार आहे. जर असे झाले तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा जुलै महिन्यात घेण्यात येईल. 

पण, हा पर्याय वाटतो तितका सोपा नाही. कारण, यामध्ये पाकिस्तान आडवा येण्याची शक्याता आहे. कारण, पाकिस्ताननेही कोरोनामुळे पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलली आहे आणि तेही १ जूनते २० जून दरम्यान पीएसल घेण्याच्या तयारीत आहेत. तसेच ते युएईत उरलेली पीएसएल घेण्याची चाचपणी करत आहेत. यामुळे विदेशी खेळाडू जे दोन्ही लीग खेळतात त्यांची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. 

याच्यावरही तोडगा काढता येऊ शकतो. जे विदेशी खेळाडू दोन्ही लीग खेळतात त्यापुढे कोणतीतरी एक लीग निवडण्याचा पर्याय ठेवता येईल. तसेही दोन्ही लीग खेळणारे खेळाडू हे तुलनने फार कमी आहेत. पण, यासाठीही बीसीसीआयला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्याशी चर्चा करुन काही मुद्यांवर सहमती निर्माण करावी लागणार आहे. 

टी २० वर्ल्डकपआधी युएईत आयपीएल 

भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सप्टेंबर १४ पर्यंत चालणार आहे. याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल २२ जूनला संपणार आहे. त्यामुळे भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळल्यानंतर इंग्लंडमध्येच राहण्याची शक्यता जास्त आहे आणि इंग्लंडबरोबरची टेस्ट सिरीज ४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 

बीसीसीआयला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाबरोबर या बाबतीत चर्चा करावी लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडबरोबरची कसोटी मालिका जुनच्या मध्यावर सुरु करण्याची विनंती करावी लागणार आहे. या परिस्थिती भारताला कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मिळणार आहे. तसेच यामुळे कसोटी मालिका ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संपेल. 

यामुळे बीसीसीआयला आयपीएल आयोजित करण्यासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत फारसे आंतरराष्ट्रीय सामने नसतात. तसेच टी - २० वर्ल्डकप हा ऑक्टोबरच्या मध्यावर होण्याची शक्यता आहे. आयपीएल बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आयसीसी टी - २० वर्ल्डकप भारतात खेळवण्याची शक्यता फारशी नाही. वर्ल्डकप शक्यतो युएई मध्ये घेतला जाऊ शकतो. 

याचबरोबर बीसीसीआयही उर्वरित आयपीएल युएईत संपूव शकते. वर चर्चा केल्याप्रमाणे जर सर्व वेळापत्रक बसले तर आयपीएल टी - २० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी २ आठवडे आयपीएल संपली असेल. याचबरोबर सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये जाण्यास सोईचे होणार आहे. तसाही युएईला अशी मोठी स्पर्धा बायो बबलमध्ये आयोजित करण्याचा यशस्वी अनुभव आहे. 

पण, या पर्यायासाठीही बीसीसीआयला अनेक संघटनांशी चर्चा करुन सहमती मिळवावी लागणार आहे.