Sat, Oct 31, 2020 12:57होमपेज › Sports › SRHvsKKR : केकेआरचा सुपर ओव्हरमध्ये विजय

SRHvsKKR : फर्ग्युसनचा पहिल्याच सामन्यात भेदक मारा, केकेआरचा सुपर ओव्हरमध्ये विजय

Last Updated: Oct 18 2020 7:52PM
अबुधाबी : पुढारी ऑनलाईन 

सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनराजर्सचा पराभव केला. केकेआरच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो हंगामातला पहिलाच सामना खेळणारा लोकी  फर्ग्युसन. त्याने सामन्यात १५ धावा देत ३ तर सुपर ओव्हरमध्ये २ धावा देत दोन विकेट घेतल्या. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ४७ धावांची नाबाद खेळी करत सामना बरोबरीत आणला होता. 

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाबाद ४७ धावांची झुंजार खेळी करुन शेवटच्या षटकात १७ धावा करुन सामना टाय केला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात लोकी फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या समदने पुढच्या चेंडूवर दोन धावा केल्या पण, तिसऱ्या चेंडूवर लोकी फर्ग्युसनने त्याचा त्रिफळा उडवत हैदराबादची सुपर ओव्हर २ धावात संपवली. त्यानंतर हे विजयसाठीचे तीन धावांचे आव्हान केकेआरने १ चेंडू पार करत अखेर सामना जिंकला.

हैदराबादने केकेआरच्या १६४ धावांचा पाठलाग करताना आपल्या रणनितीत बदल करत सलामीला डेव्हिड वॉर्नरच्या जागी केन विल्यमसनला पाठवले. विल्यमसन आणि बेअरस्टोने पॉवर प्लेमध्ये हैदराबादला ५८ धावांपर्यंत पोहचवले. पण, पॉवर प्लेनंतर पुढच्याच लॉकी फर्ग्युसनने १९ चेंडूत २९ धावा करणाऱ्या केन विल्यमसनला बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला.

या धक्यातून सावरण्यासाठी हैदराबादने प्रियम गर्गला बढती दिली. पण, फर्ग्युसनने त्यालाही ४ धावांवर बाद करत हैदराबादला अजून एक धक्का दिला. पाठोपाठ दोन विकेट गेल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर डाव सावरण्यासाठी मैदानावर आला पण, २८ चेंडूत ३६ धावांची खेळी करत सेट झालेल्या बेअरस्टोची महत्वाची विकेट मिळवत वरुण चक्रवर्तीने हैदराबादच्या अडचणीत वाढ केली. बेअरस्टो बाद झाल्यामुळे हैदराबादची अवस्था १ बाद ५७ वरुन ३ बाद ७० अशी झाली. 

हैदराबादच्या डावाची १० षटके शिल्लक असताना वॉर्नर आणि मनिष पांडे क्रिजवर होते. पण, आज भलत्याच फॉर्ममध्ये असलेल्या लोकी फर्ग्युसनने मनिष पांडेला एका अप्रतिम यॉर्करवर ६ धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार वॉर्नरने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत संघाचे शतक १४ व्या षटकात धावफलकावर लावले. पण, त्याला साथ देण्यासाठी आलेल्या विजय शंकरने ७ धावांवर बाद होत निराशा केली.

त्यानंतर वॉर्नर आणि अब्दुल समद यांनी हैदराबादचा डाव सावरत झपाट्याने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी ३७ धावांची भागिदारी करत झुंज दिली. पण, हैदराबादला ७ चेंडूत विजयसाठी १८ धावांची गरज असताना समद मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. अखेरच्या षटकात वॉर्नरने सलग तीन चौकर मारत सामना आवाक्यात आणला. त्यात रसेलने एक नो बॉल टाकून हैदराबादला सहाय्यच केले. अखेर २ चेंडूत ४ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर २ तर दुसऱ्या आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव करुन सामना टाय केला. 

तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. केकेआरनेही आपल्या डावाची आक्रमक सुरुवात करत पॉवर प्ले मध्ये ४८ धावा केल्या. सलामीवीर राहुल त्रिपाठीने आक्रमक फलंदाजी करत १६ चेंडूत २३ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलही त्याला चांगली साथ देत होता. पण, पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर नटराजनने त्रिपाठीचा त्रिफळा उडवत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. 

त्यानंतर नितीश राणा आणि शुभमन गिलने केकेआरचा डाव पुढे नेला. नितीश राणा आक्रमक फलंदाजी करत होता तर शुभमन गिल बॉल टू रन रणनितीने खेळत होता. पण, राशीद खानने ३६ धावांवर खेळणाऱ्या शुभमन गिलला बाद करत केकेआरला दुसरा धक्का दिला. त्यानंतर विजय शंकरनेही हैदराबादला यश मिळवून देत १६ चेंडूत २७ धावा करणाऱ्या नितीश राणाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गिल आणि राणा दोघांचेही झेल प्रियम गर्गने पकडले. 

केकेआरला लागलेली ही गळती सुरुच राहिली. टी नटराजनने केकेआरचा धडाकेबाज पण आऊट ऑफ फॉर्म असलेल्या आंद्रे रसेलला ९ धावांवर बाद करुन चौथा धक्का दिला. आता अखेरची पाच षटके राहिली असताना कर्णधार मॉर्गन आणि माजी कर्णधार कार्तिक क्रिजवर होते. दरम्यान, फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधार पद सोडलेल्या कार्तिकने आक्रमक फलंदजी करण्यास सुरुवात केली. 

कार्तिकची आक्रमक फलंदाजी पाहून कर्णधार मॉर्गननेही आपला गिअर बदलला या दोघांनी अखेरच्या ५ षटकात ५८ धावा करत संघाला १६३ धावांपर्यंत पोहचवले. कार्तिकने १४ चेंडूत नाबाद २९ तर मॉर्गनने २३ चेंडूत ३४ धावा केल्या. मॉर्गनला थंपीने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर बाद केले.

 "