Thu, Dec 03, 2020 07:11होमपेज › Sports › KXIPvsKKR : केकेआरला खाली खेचत पंजाब चौथ्या स्थानी

KXIPvsKKR : केकेआरला खाली खेचत पंजाब चौथ्या स्थानी

Last Updated: Oct 26 2020 11:19PM
शारजाह : पुढारी ऑनलाईन 

कोलकता नाईट रायडर्सने ठेवलेले १५० धावांचे आव्हान किंग इलेव्हन पंजाबने १८.५ षटकात २ फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. या विजयाबरोबरच पंजाबने १२ गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली. पंजाबच्या या विजयात  मोहम्मद शमी, (३५ धावांत ३ विकेट), मंदीप सिंग (५६ चेंडूत ६६ धावा), ख्रिस गेलने (२९ चेंडूत ५१ धावा) मोलाचे योगदान दिले. 

किंग इलेव्हन पंजाबची सुरूवात संथ गतीने झाली. राहुल आणि मंदीप यांनी पहील्या ६ षटकात  बिनबाद ३६ अशी केली. त्यातच चक्रवर्तीने राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला झाला. पण या धक्क्यातून पंजाब लगेच सावरला राहुल बाद झाल्यानतंर  आलेल्या ख्रिस गेलने तडाखेबाज फलंदाजी करत आक्रमक संघाला १४ व्या षटकात शतक पार करून दिले. त्याला मंदीप सिंगने चांगली साथ दिली.

त्यानंतर गेलची आक्रमक फंलदाजी पाहून दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या मंदीपने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ख्रिस गेलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागेदारी करत पंजाबला विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवले. विजयासाठी तीन धावांची गरज असताना २९ चेंडूत ५१ धावा करून ख्रिस गेल बाद झाला. त्यानंतर आलेल्या पुरण आणि मंदीप सिंगने विजयाची औपचारीकता पूर्ण केली. मंदीप सिंगने ५६ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी करून पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच षटकात नितीश राणाला शुन्यावर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर पंजाबचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने भेदक मारा केला. त्याने दुसऱ्या षटकात राहुल त्रिपाठी ( ७ ) आणि दिनेश कार्तिकला ( ० ) बाद करुन केकेआरची अवस्था २ षटकात ३ बाद १० धावा अशी केली. यानंतर सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार इऑन मॉर्गनने केकेआरची पडझड रोखत पहिल्या ६ षटकात संघाला ५४ धावांपर्यंत पोहचवले. 

सेट झाल्यानंतर गिल आणि मॉर्गननने आपली धावगती वाढवण्यास सुरुवात केली. शारजाहच्या छोट्या बाऊंडरीचा चांगलाच फायदा उचलत मॉर्गन आणि गिलने चौकार आणि षटकारांची बरसात करत केकेआरला ९ षटकात ८२ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर मात्र केकेआरने पुनरागमन करत धोकादायक मॉर्गनला ४० धावांवर बिश्नोईने बाद केले. मॉर्गन आणि गिलने चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी रचली. 

दरम्यान, शुभमन गिलची साथ देण्यासाठी आलेला सुनिल नारायण ६ धावांची भर घालून पॅव्हेलियनमध्ये परतला. जॉर्डनने त्याचा त्रिफळा उडवला. या दोन धक्यानंतर केकेआरची धावगती मंदावली. दरम्यान, गिलने आपले अर्धशतक ३७ चेंडूत पूर्ण केले. पण, दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणारे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत होते. आता कमलेश नागकोटीही ६ धावांची भर घालून बाद झाला. त्यामुळे केकेआरला १५ षटकात ११३ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

केकेआरची गळती अखेच्या पाच षटकातही कायम राहिली. नागकोटी पाठोपाठ पॅट कमिन्स १ धावेवर बाद झाला. त्यामुळे आता केकेआरची धावगती वाढवण्याची जबाबदारी शुभमन गिलवर आली. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या लोकी फर्ग्युसननेही आल्या आल्या आक्रमक फटके मारत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. पण, अनुभवी जॉर्डन आणि शमीने डेथ ओव्हरमध्ये चांगला मारा करत या दोघांना चांगलचे बांधून ठवले. याच दरम्यान, शमीने गिलला ५७ धावांवर बाद करत केकेआरला आठवा धक्का दिला. मात्र फर्ग्युसनने काही आक्रमक फटके मारत संघाला २० षटकात 149 धावांपर्यंत पोहचवले. त्याने १३ चेंडूत २३ धावांची खेळी केली.