Mon, Nov 30, 2020 13:05होमपेज › Sports › DCvsKKR : चक्रवर्तीचा भेदक मारा, दिल्लीचा दारुण पराभव

DCvsKKR : चक्रवर्तीचा भेदक मारा, दिल्लीचा 59 धावांनी पराभव

Last Updated: Oct 24 2020 7:15PM
अबु धाबी : पुढारी ऑनलाईन 

कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने भेदक मारा करत 20 धावा देत दिल्लीचा निम्मा संघ बाद केला. या कामगिरीच्या जोरावर केकेआरने दिल्लीला 20 षटकात 9 बाद 135 धावात रोखले. केकेआरने प्रथम फलंदाजी करत नितीश राणाच्या 81 आणि सुनिल नारायणच्या 64 धावांच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 194 धावा केल्या होत्या.

कोलकाता नाईट रायडर्सने ठेवलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. पॅट कमिन्सने पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला पायचीत बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर कमिन्सने आपल्या दुसऱ्या षटकात सलग दोन शतके ठोकणाऱ्या शिखर धवनचा त्रिफळा उडवून देत दिल्लीचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 13 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडले. 

या दोन धक्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 10 षटकात धावफलकावर 62 धावा लावल्या. पण वरुण चक्रवर्तीने 27 धावांवर खेळणाऱ्या पंतला बाद करुन ही जोडी फोडली. पंत बाद झाल्यानंतर आलेला हेटमायरही 10 धावांची भर घालून परतला. त्यालाही चक्रवर्तीनेच बाद केले. चक्रवर्तीने पुढच्याच चेंडूवर 47 धावांवर खेळणाऱ्या कर्णधार अय्यरलाही आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. याच बरोबर दिल्लाचा निम्मा संघ शंभरी गाठण्याच्या आतच माघारी गेला. 

चक्रवर्तीने आपला विकेट घेण्याचा धडाका कायम राखत स्टॉइनिसला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर अक्षर पटेललाही 6 धावांवर बाद करत चक्रवर्तीने आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या. चक्रवर्तीच्या या भेदक माऱ्यामुळे दिल्लीची 16 षटकात 7 बाद 113 धावा अशी बिकट अवस्था झाली. त्यानंतर आलेल्या दिल्लीच्या फलंदाजांना दिल्लीचा पराभव टाळता आला नाही. अखेर केकेआरने दिल्लीला 20 षटकात 9 बाद 135 धावांमध्ये रोखत सामना 59 धावांनी जिंकला. 

तत्पूर्वी, आयपीएल 2020 मध्ये आज ( दि. 24 ) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत नॉर्खियाने शुभमन गिलला 9 धावांवर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला पण, नॉर्खियानेच त्रिपाठीचा त्रिफळा उडवत केकेआरला दुसरा धक्का दिला. 

पॉवर प्ले संपला त्यावेळी केकेआरने दोन गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा केल्या होत्या. त्यानंतर नितीश राणाने केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, कसिगो रबाडाने दिनेश कार्तिकला अवघ्या 3 धावांवर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. या पडझडीनंतर राणा आणि सुनिल नारायण यांनी डाव सावरत संघाला 10 षटकात 75 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर नितीश राणाने आपल्या धावांची गती वाढवली. त्याने 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सुनिल नारायणनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी रचत 16 षटकात संघाचे दिडशतक धावफलकावर लावले. 

दिल्लीसाठी मोठी डोकेदुखी ठरत असणारी ही जोडी अखेर रबाडाने फोडली. त्याने 4 षटकारांच्या मदतीने 32 चेंडूत 61 धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या सुनिल नारायणला बाद केले. नारायण बाद झाल्यानंतर राणाने आक्रमक फलंदाजी करत डेथ ओव्हमध्ये धावगती वाढवण्यास सुरुवात केली. दरम्यान, कर्णधार मॉर्गननेही फटकाबाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी 19 चेंडूत 37 धावांची भागिदारी रचत केकेआरला 20 षटकात 194 धावांपर्यंत मजल मारुन दिली. नितीश राणाने 52 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. तर मॉर्गनने 9 चेंडूत 17 धावा केल्या.