Tue, Oct 20, 2020 11:59होमपेज › Sports › CSKvsDC : धवनच्या पहिल्या वहिल्या शतकामुळे दिल्ली 'शिखरा'वर

CSKvsDC : धवनच्या पहिल्या वहिल्या शतकामुळे दिल्ली 'शिखरा'वर

Last Updated: Oct 17 2020 11:29PM
शारजाह : पुढारी ऑनलाईन 

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने आपले टी - २० मधील पहिले शतक झळकावत दिल्लीला ५ विकेट्सनी विजय मिळवून दिला. चेन्नईचे १८० धावांचे आव्हान अखेरच्या षटकात फटकेबाजी करत दिल्लीने पार केले. यात अक्षर पटेलच्या अखेरच्या षटकात मारलेल्या तीन षटकारांचे मोलाचे योगदान राहिले त्याने ५ चेंडूत २१ धावांची विजयी खेळी केली. शिखर धवनने झुंजार शतक ( १०१ ) झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील पहिले शतक ठरले. चेन्नईकडून दिपक चाहरने दोन तर सॅम कुरेन, शार्दुल ठाकूर आणि ब्रोव्होने प्रत्येकी १ विकेट घेतली. दिल्लीने हा सामना जिंकून १४ गुण मिळवत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले. सध्या दिल्ली आणि मुंबईत अव्वल स्थान राखण्यासाठी चुरस पाहयला मिळत आहे. उद्या मुंबईचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर सामना आहे. या सामन्यातील निकालावर पुन्हा अव्वल क्रमांकावर कोण हे ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ भोपळाही न फोडता बाद झाला. त्याला दिपक चाहरने बाद केले. त्यानंतर दुसरा सलामीवीर शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत चौकराने दिल्लीचे खाते उघडले. पण, त्याच्या जोडीला आलेल्या अजिंक्य रहाणेने पुन्हा निराशा केली. तो १० चेंडूत ८ धावा करुन माघारी परतला. त्यालाही दिपक चाहरनेचे बाद केले. 

सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी पडझड रोखत पॉवर प्लेमध्ये ४१ धावा केल्या. शिखरने आपला आक्रमक बाणा पॉवर प्लेनंतरही कायम राखत २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या हंगामातील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. याचबरोबर दिल्लीने १० षटकात ७६ धावांपर्यंत मजल मारली. 

पण, ब्रोव्होने श्रेयस अय्यरला २३ धावांवर बाद करत ६८ धावांची ही भागिदारी तोडली. त्यानंतर शिखरने स्टोइनिसच्या साथीने १३ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या शिखरने दिल्लीच्या डावाची सुत्रे आपल्या हातात घेत वेगाने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. दिल्लीला विजयासाठी ३० चेंडूत ५१ धावांची गरज असताना अंबाती रायडूने शिखर धवनला जीवनदान दिले. त्यानंतर पुढच्याचे चेंडूवर स्टॉइनिसने षटकार मारुन हा कॅच मॅच घालवणारा ठरणार असल्याचे संकेत दिले. पण, शार्दुलने स्टॉइनिसला बाद करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले. 

दरम्यान, शिखर आपल्या शतकाकडे वेगाने कूच करत होता. याचबरोबर दिल्लीही विजयाच्या दिशेने अग्रेसर होत होती. अखेर शिखरने आयपीएलमधील तसेच टी - २० कारकिर्दितील आपले पहिले शतक ५७ चेंडूत झळकावले. पण, १९ वे षटक टाकणाऱ्या सॅम कुरेनने फक्त ४ धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीसमोर अखेरच्या षटकात १७ धावांचे आव्हान आले. अखेरचे षटक टाकण्यासाठी रविंद्र जडेजा आला होता. पण, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने सलग दोन षटकार मारत सामना ३ चेंडूत ३ धावा असा आला. पुढच्या चेंडूवर दोन धावा करुन अक्षरने सामना बरोबरीत आणला आणि त्यानंतर सामना षटकार मारुनच संपवला.  

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, दिल्लीच्या तुषार देशपांडेने सॅम कुरेनला पहिल्याच षटकात शुन्यावर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून चेन्नईने लगेच सावरत आपली गाडी रुळावर आणली. शेन वॉटसन आणि फाफ ड्युप्लेसिसने पॉवर प्लेमध्ये ३९ धावा केल्या. त्यानंतर या दोघांनी मिळून सीएसकेला १० षटकापर्यंत ७१ धावांपर्यंत पोहचवले. 

वॉटसन आणि ड्युप्लेसिसने १० व्या षटकानंतर आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ड्युप्लेसिसने आपले अर्धशतक ३९ चेंडूत पूर्ण केले. पण, या अर्धशतकाचा आनंद सीएसकेला फार काळ साजरा करता आला नाही. कारण दुसऱ्याच चेंडूवर नॉर्खियाने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवला. वॉटसन २८ चेंडूत ३६ धावा करुन बाद झाला. शेन वॉटसन बाद झाल्यानंतर आलेल्या अंबाती रायडूने चेन्नईची धावगती मंद होऊ दिली नाही. त्याने आणि ड्युप्लेसिसने १४ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. 

पण, त्यानंतर रबाडाने ५८ धावांवर खेळणाऱ्या ड्युप्लेसिसला बाद करुन सीएसकेला मोठा धक्का दिला. डुप्लेसिसनंतर महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला आला. धोनी आणि रायडूच्या हातात आता फक्त शेवटी ५ षटके होती. रायडूने आपला गिअर लगेचच बदलत आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. पण, त्याला साथ देणारा धोनी ३ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे सीएसकेच्या फॅन्सची निराशा झाली. 

धोनी बाद झाल्यानंतर आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या रायडूने जडेजाच्या साथीने संघाला १५० चा टप्पा पार करुन दिला. त्यानंतर अखेरच्या दोन षटकात ३२ धावा करत संघाला १७९ धावांपर्यंत मजल मारुन दिली. रायडूने २५ चेंडूत ४५ धावा तर जडेजाने १३ चेंडूत ३३ धावा ठोकल्या. 

 "