Fri, Sep 25, 2020 16:37होमपेज › Sports › INDvsWI : डिफेंड करताना भारत कच्चाच, विंडीजची मालिकेत बरोबरी

INDvsWI : डिफेंड करताना भारत कच्चाच, विंडीजची मालिकेत बरोबरी

Last Updated: Dec 08 2019 10:40PM
तिरुवअनंतपुरम : पुढारी ऑनलाईन 

आज तिरुवअनंतपुरम येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारत जरी चेस करताना मास्टर असला तरी टार्गेट डिफेंड करताना भारत अजून कच्चा असल्याचेच दाखवून दिले. शिवम दुबेच्या दमदार (54) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ठेवलेले 171 धावांचे लक्ष्य विंडीजने 8 गडी आणि 9 चेंडू राखून पार केले. यात लिंडल सिमन्सने नाबाद 67 धावा केल्या तर त्याला सलामीवीर एव्हिन लुईसने 40, हेटमायरने 23 आणि निकोलस पूरनने आक्रमक 38 धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचाही हातभार विंडीजच्या विजयाला लागला. भारताने तीन त्यातील दोन लिंडल सिमन्सचे 2 झेल सोडले. या विजयाबरोबरच विंडीजने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. आता 11 तारखेला मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात मालिकाचा निर्णय लागणार आहे. 

भारताच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने दमदार सुरुवात केली. त्यातच भारताने झेल सोडून विंडीजला आयती संधी दिली. याचा फायदा घेत सिमन्स आणि लुईसने 10 षटकात 73 धावांची सलामी दिली. लिंडल सिमन्स आणि एव्हिन लुईसने चेंडू नवीन असताना भारतीय जलदगती गोलंदाजांना सांभाळून खेळण्याचा पवित्रा अवलंबला. त्यांनंतर फिरकी गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. सिमन्स आणि लुईसची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच 3 षटकार आणि 3 चौकारांच्या साथीने 35 चेंडूत 40 धावा करणाऱ्या लुईसला वॉशिंग्टन सुंदरने त्याला चकवले आणि पंतकरवी यष्टीचीत केले. 

त्यानंतर सिमन्सने आक्रमणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत विंडीजला 14 व्या षटकात 100 च्या पार पोहचवले. यानंतर हेटमायरनेही फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने जडेजाच्या सलग दोन चेंडूवर दोन षटकार मारले. पण, त्याचा तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न विराटने अप्रतिम झेल पकडत हाणून पाडला. 112 धावा झाल्यानंतर विंडीजचा दुसरा फलंदाज बाद झाला होता. 

पण, तोपर्यंत लिंडल सिमन्मने धावांची गती वाढवत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या जोडीला आलेल्या निकोलस पूरननेही आक्रमक फलंदाजी करत धावा आणि चेंडूतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पूरनने कोणतीही जोखीम न घेता संधी मिळेल तो चेंडू सीमापार धाडला. सिमन्स आणि पूरन यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागिदारी रचत सामना 9 चेंडू आणि 8 विकेट राखून जिंकला. सिमन्सने 45 चेंडूत 4 षटकार 4 चौकार मारत नाबाद 67 धावा केल्या तर बंदीनंतर खेळणाऱ्या निकोलस पूरनने 18 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. 

तत्पूर्वी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या होत असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजने पॉवर प्लेमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज पेरीला गोलंदाजी दिली. या खेळीत सलामीवीर लोकेश राहुल फसला आणि स्विप मारण्याच्या नादात 11 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराटनेही आपली स्ट्रॅटेजी बदलत डावखुऱ्या शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. 

अडखळत सुरुवात करणाऱ्या शिवम दुबेने सातव्या षटकानंतर मोठे फटके खेळण्यात सुरुवात केली. पण, दुसऱ्या बाजूने धावा करण्यासाठी झगडत असलेल्या रोहितचा होल्डरने त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर विराट मैदानावर आला. दरम्यान, शिवम दुबेने आक्रमक पवित्रा धारण केला. त्याने पोलार्डने टाकलेल्या 9 व्या षटकात 3 षटकार खेचत भारताला 84 धावांपर्यंत पोहचवले. शिवमही आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने 27 चेंडूत 50 धावा करत भारताला 10 व्या षटकात शंभरच्या जवळ पोहचवले. पण, प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याची गडबड त्याला महागात पडली. तो हेडन वॉल्शच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात हेटमायरकडे झेल देऊन परतला. त्याने 30 चेंडूत 4 षटकार, 3 चौकार मारत 54 धावा केल्या. 

दुबे बाद झाल्यानंतर विराट आणि ऋषभ पंतने भारताचा डावा पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण, केसरिक विल्यम्सने विराटला 19 धावांवर बाद करत भारताला चौथा आणि मोठा धक्का दिला. विराट बाद झाला त्यावेळी भारत्याच्या 13.2 षटकात 120 धावा झाल्या होत्या. विराटला बाद केल्यानंतर विंडीजला भारताच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश आले. विराट बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतला. दुसऱ्या बाजूने पंतनेही धोका न पत्करता एकेरी दुहेरीवर भर दिला. त्यामुळे भारताला 15 षटकापर्यंत 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

भारताची धावगती मंदावल्यानंतर ऋषभ पंतने षटकात एक मोठा फटका मारण्याची रणनिती अवलंबत भारताला 17 व्या षटकात 150 पर्यंत पोहचवले. पण, अखेरच्या दोन षटकात विंडीजने टिच्चून मारा केल्याने भारताला धावा करण्यात अडचणी येत होत्या. त्यातच विल्यम्सने जडेजाला 9 धावांवर बाद केल्याने दुसऱ्या बाजूला असलेल्या पंतवर दबाव वाढवला. त्यातच अखेरचे षटक टाकणाऱ्या कोट्रेलने स्लोव्हर वनचा प्रभावी मारा करत भारताला 170 धावात रोखले. पंतने 22 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या.

 "