Tue, Sep 22, 2020 06:39होमपेज › Sports › INDvsAUS : आस्ट्रेलियाचा भारतावर 10 विकेट राखून दणदणीत विजय

आस्ट्रेलियाचा भारतावर १० विकेट राखून विजय

Last Updated: Jan 14 2020 8:36PM
मुंबई ; पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवत भारताचे 256 धावांचे आव्हान 37.4 षटकात पार करुन 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून दोन्ही सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी नाबाद शतके केली. वॉर्नरने नाबाद 128 तर फिंचने नाबाद 110 धावा केल्या. मालिकेतला पहिलाच सामना दणक्यात जिंकल्याने कांगारुंचे मनोबल डबल झाले असेल तर भारतावर आपला खेळ सुधारण्यासाठी प्रचंड दबाव असणार आहे. 

भारताने ठेवलेल्या 256 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरोन फिंचने सुरवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्याचा पवित्रा घेतला. दुसऱ्या बाजूने डेव्हिड वॉर्नरने सावध फलंदाजी केली. त्याने ज्यावेळी 10 धावा पूर्ण केल्या त्यावेळी त्याने एकदिवसीय सामन्यांमधील आपल्या 5 हजार धावा टप्पा पार केला. 

जरी वार्नरने सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतला तरी त्याने सेट झाल्यानंतर आक्रमक फलंदाजी करत धावा आणि चेंडू यातील अंतर कमी केले. फिंच आणि वार्नर या सलामी जोडीने शतकी सलामी केली. वॉर्नर फिंचची ही एकदिवसीयमधील 9 वी शतकी सलामी आहे. पहिल्यांदा संथ फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने फिंचच्या आधी आपले अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ फिंचनेही आपले अर्धशतक पूर्ण केले पण, धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या फिंचची धावगती 10 षटकांनंतर मंदावली.  

पॉवर प्ले संपल्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी कांगारुंच्या धावगतीला काही प्रमाणात ब्रेक लावला. पण, अखेर दोन्ही सलामीवीरांनी दिडशतकी भागिदीरी पूर्ण केली. वॉर्नर आणि फिंच याच्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सामना बिनबादच संपवण्याचा चंग बाधला होता. ही भागिदारी द्विशतकाकडे चालली होती. दरम्यान, वॉर्नरने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे एकदिवसीय कारकिर्दितील 18 वे शतक आहे. त्याने आपले हे शतक चौकार मारत साजरे केले. याचबरोबर कांगारुंची द्विशतकी सलामीही पूर्ण झाली. 

त्यानंतर वॉर्नर पोठोपठ फिंचनेही आपले कारकिर्दितील 16 वे शतक ठोकले. या दोघांनी भारताचे 256 धावांचे आव्हान 37.4 षटकातच पार करत भारतावर दणदणीत विजय मिळवला. 

तत्पूर्वी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला 255  धावात रोखले. ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. मिशेल स्टार्कने धावात 3 तर पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी त्यांना चांगली साथ दिली. झांम्पा, एश्टन अॅगरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 74 धावा केल्या तर केएल राहुलने 47 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची शतकी भागिदारी केली. पण, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद झाल्याने भारताला ऑस्ट्रेलियासमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकात टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना वेसन घालण्यात यश मिळवले. त्यातच स्टार्कने रोहित शर्माला 10 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. पण, रोहित बादा झाल्यानंतर आलेल्या केएल राहुल आणि शिखर धवन यांनी पहिल्या 10 षटकात सावध फलंदाजी करत कांगारुंना आणखी यश मिळू दिले नाही. भारताने पहिल्या 11 षटकात 1 बाद 47 धावांपर्यंत मजल मारली होती. 

त्यानंतर शिखर आणि राहुल दोघांनाही जम बसल्यावर धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिखर धवनने दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक  65 चेंडूत पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय सामन्यातील 28 वे अर्धशतक होते. याचबरोबर भारताने 20 षटकात धावफलकावर आपले शतक झळकावले. शिखर पाठोपाठ राहुलही सेट झाला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी रचली. अर्धशतकानंतर शिखरने आपली धावगती वाढवली. दरम्यान, राहुलही अर्धशतकाजवळ पोहचला होता पण, 47 धावांवर असताना एगरने त्याला स्मिथकरवी झेलबाद केले. त्याचे अर्धशतक 3 धावांनी हुकले. त्याने 60 चेंडू 47 धावा केल्या. 

राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीवर झपाट्याने धावा करण्याची जबाबदारी आली. त्यातच सेट झालेला शिखरही पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 74 धावा करुन बाद झाला. शिखर बाद झाला त्यावेळी भारताच्या 28.5 षटकात 140 धावा झाल्या होत्या. सामन्याची 30 षटके झाली असताना भारताचे दोन नवे फलंदाज खेळपट्टीवर आले होते. कर्णधाराच्या जोडीला आता श्रेयस अय्यर आला होता. 

राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीवर झपाट्याने धावा करण्याची जबाबदारी आली. त्यातच सेट झालेला शिखरही पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 74 धावा करुन बाद झाला. सामन्याची 30 षटके झाली असताना भारताचे दोन नवे फलंदाज खेळपट्टीवर आले होते. कर्णधाराच्या जोडीला आता श्रेयस अय्यर आला होता. कर्णधार विराटने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने अॅडम झांम्पाला षटकार मारुन आपले इरादे स्पष्ट केले होते  पण, अॅडम झांम्पाने पुढच्याच चेंडूवर विराटला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. भारताच्या धावगती वाढवण्याच्या दबावात विकेट पडत होत्या. त्यातच श्रेयस अय्यरही 4 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे भारताचा निम्मा संघ 164 धावात माघारी गेला होता. 

भारताचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर रविंद्र जडेजाने चांगल्या धावगतीने धावा करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत संथ गतीने खेळत होता. पण, अखेरचा 10 षटके राहिली असताना पंतने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. परंतु चांगली फलंदाजी करणारा रविंद्र जडेजाला केन रिचर्डसनने 25 धावांवर बाद केल्याने पुन्हा दबाव भारतावर आला. त्यानंतर ऋषभ पंतही 28 धावांवर बाद झाला त्यामुळे भारताची मोठी धावसंख्या उभारण्याची आशा धुळीस मिळाली. शार्दुल ठाकूरने काही आक्रमक फटके मारले खरे पण, स्टार्कने त्याचा 13 धावांवर त्रिफळा उडवत त्याला हात मोकळे करण्याची फार संधी दिली नाही. अखेरच्या काही षटकात कुलदीप यादव आणि शामीने चिवट फलंदाजी करत भारताला 250 चा टप्पा पार करुन दिला. अखेर कुलदीप यादव धावबाद आणि त्यानंतर शमी झेलबाद झाल्यामुळे  49.1 षटकात भारताचा डाव 255 धावात संपुष्टात आला. 

 "