INDvsSA : भारताचा विजय; मालिकेत १-० आघाडी

Published On: Sep 18 2019 6:23PM | Last Updated: Sep 18 2019 10:23PM
Responsive image


मोहाली : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १५० धावांचे आव्हान १९ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत सामना ७ विकेट राखून जिंकला. कर्णधार विराटने नाबाद ७२ धावा केल्या तर शिखर धवनने ४० धावा करून चांगली सुरुवात करुन दिली. या विजयाबरोबच भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा आणि अखेरचा सामना २२ सप्टेंबरला बेंगळुरु येथे होणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेने ठावलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने तुफानी सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. रोहिक शर्माने दोन षटकार मारत सामना लवकर संपण्याचा इरादा असल्याचे पहिल्या दोन षटकात स्पष्ट केले होते. भारताने ३.५ षटकात ३३ धावा केल्या होत्या पण, फुहेल्कवायोने रोहित शर्माला पायचित पकडत हे मनसुबे उधळून लावले. त्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराटच्या साथीने भारताची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. 

शिखरने आक्रमक पवित्रा घेतला त्याला विराटने दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत होता. या दोघांनी भारताला १२ व्या षटकात नव्वदी पार करून दिली. पण, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला धवन ४० धावांवर असताना शामसीला पुढे सरसावत मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. मिलरने धवनचा अप्रतिम झेल पकडत भारताच्या धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. 

पण, दुसऱ्या बाजूला सेट झालेला कर्णधार विराट खेळत होता आणि भारताला विजयासाठी ५६ धावांची गरज होती. त्याच्या जोडीला आला होता तो ऋषभ पंत पण, पंतला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची  मिळालेली संधी वाया घालवली. त्याला ४ धावाच करता आल्या. दरम्यान, कर्णधार विराट आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने ४० चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्यांने आपला गिअर बदलत झपाट्याने धावा करायला सुरुवात केली. त्याने १५० धावांचे लक्ष १९ व्या षटकात पूर्ण केले. विराटने ५२ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली. त्याला १६ धावा करुन चांगली साथ दिली. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा आणि अखेरचा सामना २२ सप्टेंबरला बेंगळुरु येथे होणार आहे. 

तत्पूर्वी, भारताने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मोहालीच्या फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर सलामीवीर डीकॉक आणि रीझा हेन्रिक्सने चांगली सुरुवात केली. या दोघांनी आफ्रिकेला ३ षटकात ३० धावांपर्यंत मजल मारुन दिली. पण, चौथ्या षटकात दिपक चहरने  हेन्रिक्सला ६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. 

द. आफ्रिकेने आपला पहिला फलंदाज गमावल्यानंतर कर्णधार डीकॉकने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यांने पॉवर प्लेचा फायदा उचलत आफ्रिकेला ३९ धावांपर्यंत पोहचवले. त्यात डीकॉकच्या एकट्याच्या ३३ धावा होत्या. पॉवर प्लेनंतर डीकॉकला साथ देत असलेल्या टेम्बा बवूमाने आक्रमक पवित्रा धारण केला. या दोघांनी मिळून आफ्रिकेला १० षटकात ७८ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर कर्णधार डीकॉकने आपले अर्धशतक ३४ चेंडूत पूर्ण केले.  

पण, नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराटने डीकॉकचा अप्रतिम झेल पकड भारताला मोठा दिलासा दिला. डीकॉक बाद झाल्यानंतर आल्यानंतर आलेला डसेनला जडेजाने अवघ्या १ धावेवर आल्या पावली माघारी पाठवले. ९० धावात ३ फलंदाज माघारी गेल्यानंतर टेम्बा बवूमाने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याला दुसऱ्या बाजूने डेव्हिड मिलरने चांगली साथ देत होता. पण, १८ व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो ४९ धावांवर बाद झाला. 

बवूमा बाद झाला त्यावेळी आफ्रिकेच्या ४ बाद १२६ धावा झाल्या होत्या. भारताच्या युवा गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकात  टिच्चून मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना शांत ठेवले. त्यानंतर हार्दिक पांड्याने १९ व्या षटकात मिलरचा त्रिफळा उडवत आफ्रिकेला अजून एक मोठा धक्का दिला. अखेर प्रिटोरियस आणि फुलुक्वायो यांनी अखेरच्या षटकात २ षटकार मारून आफ्रिकेला ५ बाद १४९ धावांपर्यंत नेले.