Thu, Sep 24, 2020 10:23होमपेज › Sports › U-19WC : भारताने जपानचा उडवला ४१ धावात खुर्दा, दुसरा विजय साजरा

U-19WC : भारताने जपानचा उडवला ४१ धावात खुर्दा, दुसरा विजय साजरा

Last Updated: Jan 21 2020 5:56PM
ब्लोएमफोंटेन : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत अ गाटातील सामन्यात भारताने जपानचा ४१ धावात खुर्दा उडवला. त्यानंतर हे आव्हान ४.५ षटकात बिनबाद पार करत वर्ल्डकपमधील आपला दुसरा विजय साजरा केला. आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या जपानच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. अवघ्या २३ षटकात भारतीय गोलंदाजांनी जपानचा अख्खा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडला. भारताकडून रवी बिश्नोईने अवघ्या ५ धावा देत ४ विकेट घेतल्या तर कार्तिक त्यागीने १० धावात ३ विकेट घेतल्या. आकाश सिंगने २ तर विद्याधर पाटीलने १ विकेट घेत त्यांना उत्तम साथ दिली. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांना जपानच्या नवख्या फलंदाजांची पहिला चेंडू पासूनच भंबेरी उडवायला सुरुवात केली. भारताच्या कसलेल्या गोलंदाजीसमोर जपानचे फलंदाज फक्त हजेरी लावून परत जात होते.  जपानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. जपानकडून शू नोगोची आणि केंटो ओटा डोबेल यांनी प्रत्येकी ७ धावा केल्या. या जपानकडून या सामन्यातील सर्वोच्च खेळी आहेत. जपानच्या निम्या संघाला भोपळाही फोडता आला नाही. 

भारताकडून सर्वात प्रथम जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागीने जपानला धक्के देण्यास सुरुवात केली. त्याने जपानच्या दोन फलंदाजांना पाठोपाठ बाद केले. त्यानंतर लेग स्पिनर रवी बिश्नोईने जपानला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत मधली फळी गारद केली. त्यागीने ३ तर रवीने ४ विकेट घेतल्या. त्याला आकाशने २ आणि विद्याधरने १ विकेट घेत चांगली साथ दिली. त्यामुळे जपानचा संपूर्ण संघ २२.५ षटकात ४१ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये पोहचला. 

त्यानंतर भारताने हे ४१ धावांचे माफक आव्हान ४.५ षटकातच कोणतीही विकेट न घेता पार केले. यशस्वी जैस्वालने आक्रमक फलंदाजी करत १८ चेंडूत २९ धावा ठोकल्या. यात १ षटकात ५ चौकारांचा समावेश होता. तर कुमार कुशाग्रने १३ धावांची खेळी केली. भारताने सामना १० विकेट आणि जवळपास ४५ षटके राखून जिंकला. या विजयाबरोबरच भारत ४ गुणांसह अ गटात अव्वल स्थानावर पोहचला आहे. भारताचे नेट रनरेट ३.७ इतके आहे.   

१९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील ४१ धावात गारद होणारा जपान हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी कॅनडा आणि बांगलादेश ४१ धावांवर गारद झाला होता. या स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा विक्रम स्कॉटलँडच्या नावावर आहे. २००४ ला ऑस्ट्रेलियाने त्यांना २२ धावात गारद केले होते.

 "