मुंबई : इंग्लंड विरुद्ध पुढील वर्षी होणार्या भारत दौर्यातील निर्धारित षटकांच्या मालिकेचा समावेश करण्यासाठी नियमित पाच कसोटी सामन्याऐवजी चार कसोटी सामने खेळविण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ऑनलाईन कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली. इंग्लंड चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 साठी भारताचा दौरा करणार आहे. द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करणे खूप सोपे असते. कारण, यामध्ये संघांची संख्या कमी असते. जेव्हा आठ, नऊ आणि दहा संघ असतात तेव्हा ते अधिक कठीण होते. असे असले तरी आम्हाला परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल.
कारण, अनेकजण कोरोनाच्या दुसर्या लाटेबाबत चर्चा करीत आहेत, असे गांगुलीने सांगितले. निर्धारित षटकांच्या मालिकेत सुरुवातीला तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. ज्याचे आयोजन यावर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे ती स्थगित करावी लागली. संशोधित कार्यक्रमानुसार टी-20 सामन्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. बोर्डाने भारतात पुढील वर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबरदरम्यान होणार्या टी-20 विश्वचषकाकडे पाहता, असे करण्यात आले आहे.