Thu, Jun 24, 2021 11:12
युरो कपचा धुरळा उडणार

Last Updated: Jun 11 2021 2:50AM

लंडन : वृत्तसंस्था

युरोप खंडाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी युरो कप फुटबॉल स्पर्धा आज मध्यरात्री पासून युरोप खंडातील 11 वेगवेगळ्या शहरात खेळवली जात आहे. ही स्पर्धा गेल्या वर्षी म्हणजे 12 जून ते 12 जुलै 2020 या काळात खेळवली जाणार होती. परंतु, कोरोना महामारी संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा 12 जून ते 12 जुलै 2021 अशी एक महिनाभर खेळली जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही स्पर्धा नेहमीपेक्षा एक किंवा दोन देशांच्या यजमानपदाखाली भरवली जात नसून, यंदा या स्पर्धेसाठी युरोप खंडातील 11 वेगवेगळ्या शहरात खेळवली जाणार आहे. युनियन ऑफ युरोपीय फुटबॉल असोसिएशन (यूएफा) तर्फे या स्पर्धेचे संचलन केले जाते. पोर्तुगाल हा या स्पर्धेचा गतविजेता असून, यंदा हा संघ फ्रान्स, हंगेरी आणि जर्मनी यांच्यासह ‘फ’ गटात आहेे. या गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ समजले जात आहे.

स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी होणार आहेत. त्यांची सहा गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यांच्यात साखळी लढतीतून 16 संघ ‘राऊंड ऑफ 16’साठी पात्र ठरतील. त्यांच्यात बाद फेरीच्या सामन्यांतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील आणि त्यातून चार संघ सेमीफायनलसाठी पुढे येतील. यातून दोन विजयी संघांमध्ये अंतिम लढत होईल. 

विजेता ठरेल तीनशे कोटींचा मालक

स्पर्धेतील विजेत्या संघाला दहा मिलेनियम युरो (88 कोटी 56 लाख रुपये) तर उपविजेत्या संघाला (61 कोटी 99 लाख रुपये) इतकी रक्‍कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. सेमीफायनल खेळणार्‍या 4 संघांना प्रत्येकी 44 कोटी 28 लाख रुपये मिळणार आहेत. साखळी फेरीपासून विजयी संघाला बक्षीस मिळणार असल्याने स्पर्धेत विजेता ठरणारा संघ जवळपास तीनशे कोटींची कमाई करणार आहे.

अकरा शहरांत होणार लढती

आशियातील रोम (इटली) बाकू (अझरबैझान), सेंट पीटसबर्ग (रशिया), कोप्पेनहेगन (डेन्मार्क), अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड), बुचारेस्ट (रोमानिया), ग्लास्गो (स्कॉटलंड), सेविले (स्पेन), बुडापेस्ट (हंगेरी), म्युनिच (जर्मनी) आणि लंडन (इंग्लंड) या अकरा शहरांत युरो कपचे सामने रंगणार आहेत. ऐतिहासिक रोम शहरात या स्पर्धेचा उद्घाटनचा सामना होईल. तुर्की आणि इटली हे दोन संघ पहिल्या सामन्यात भिडतील. तर, सेमीफायनल आणि फायनलचे सामने लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर होतील.

स्पर्धेची गटवारी अशी

‘अ’ गट  
इटली, स्वित्झर्लंड, तुर्की, वेल्स,

‘ब’ गट 
बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, रशिया,

‘क’ गट  
ऑस्ट्रिया, नेदरलँड, युक्रेन, उ. मॅसेडोनिया,  

‘ड’ गट  
क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, इंग्लंड, स्कॉटलंड,

‘इ’ गट  
पोलंड, स्लोव्हाकिया, स्पेन, स्वीडन,

‘फ’ गट  
फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, पोर्तुगाल.

आजचा सामना
इटली विरुद्ध तुर्की
रात्री 12.30 वाजता