Wed, Sep 23, 2020 02:21होमपेज › Sports › चौथ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 170 धावांची महत्वपूर्ण आघाडी

इंग्लंडकडे 170 धावांची महत्वपूर्ण आघाडी

Last Updated: Jul 11 2020 11:35PM
साऊथहॅम्पटन : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. त्यांनी दिवसअखेर 8 बाद  284  धावा करुन 170 धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडकडून डॉमिनिक सिब्ले ( 50) झॅक क्रोव्हली ( 76 ) दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर रोरी बर्न्स (42) आणि बेन स्टोक्स ( 46) यांनी उपयुक्त खेळ्या करत इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहचवले. वेस्ट इंडिजकडून गॅब्रियालने 3 तर रोस्टन चेस आणि अलझारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 

चौथ्या दिवशी सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले यांनी 72 धावांची सलामी दिली. यात सलामीवीर रोरी बर्न्सने 42 धावांचे योगदान दिले. पण, रोस्टन चेसने त्याला त्याच्या अर्धशतकापासून दूर ठेवले. त्यानंतर डॉमिनिक सिब्ले आणि जो डेनली यांनी इंग्लंडचे शतक धावफलकावर लावले. सिब्लेने संयमी खेळी  करत 162 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, गॅब्रियालने या अर्धशतकाचा आनंद फार काळ टिकू दिला नाही. त्याने सिब्लेला 50 धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. 

सेट झालेला सिब्ले बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीची मदार जो डेनली आणि झॅक क्रोव्हली यांच्यावर आली. पण, 29 धावा करुन जम बसवू पाहणाऱ्या डेनलीला रोस्टन चेसने बाद करुन इंग्लंडला तिसरा धक्का दिला. डेनली बाद झाल्यानंतर झॅक क्रोव्हलीने इंग्लंडचा डाव सावरत अर्धशतक झळकावले. त्यामुळे चहापानापर्यंत जवळपास 75 धावांची आघाडी मिळवून दिली. 

क्रोव्हलीच्या जोडीला आलेल्या कर्णधार बेन स्टोक्सने सावध सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने क्रोव्हलीने धावांचा वेग वाढवत इंग्लंडची आघाडी वाढवण्यास सुरुवात केली.. दरम्यान, स्टोक्सनेही जलदगतीने धावा करण्यास सुरुवात केली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागिदारी रचली. ही जोडी विंडीजसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच विंडीजचा कर्णधार होल्डरने इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सला 46 धावांवर बाद केले. ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीला गळतीच लागली. 76 धावांवर खेळणाऱ्या क्रोव्हलीला अर्झारी जोसेफने बाद केले. त्या पाठोपाठ धोकादायक फलंदाज जोस बटलरलाही 9 धावांवर बाद करुन सहावा धक्का दिला. 

त्यानंतर आलेल्या डॉमिनिक बेस आणि ओली पोप यांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 6 बाद 265 वरुन 8 बाद 279 अशी झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडच्या 8 बाद 284 धावा झाल्या होत्या. जोफ्रा आर्चर 5 तर मार्क वूड 1 धावांवर खेळत आहेत.  

दरम्यान,काल तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 318 धावा केल्या. विंडीजकडून क्रेग ब्रेथवेट ( 65 ) आणि  डॉरिक ( 61 ) यांनी अर्धशतकी खेळी केली तर रोस्टन चेसने 47 धावांची उपयुक्त खेळी करुन विंडीजला पहिल्या डावात 114 आघाडी मिळवून दिली. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने भेदक मारा करत विंडीजच्या 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले तर जेमी अँडरसनने 3 आणि डॉम बेस 2 विकेट घेत कर्णधाराला उत्तम साथ दिली. मार्क वूडने एक बळी टिपला. 

 "