Thu, Jan 28, 2021 06:35होमपेज › Sports › क्रिकेटचा पुनःश्च हरीओम; विंडीजकडून इंग्लंडला इंग्लंडमध्ये मात

क्रिकेटचा पुनःश्च हरीओम; विंडीजकडून इंग्लंडला इंग्लंडमध्ये मात

Last Updated: Jul 12 2020 10:41PM
साऊथहॅम्पटन : पुढारी ऑनलाईन 

क्रिकेटचे पुनःश्च हरीओम करणाऱ्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडला त्यांच्याच भुमीत पराभवाची धूळ चारली. विंंडीजने पहिला कसोटी सामना 4  विकेट राखून जिंकत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे विंडीजचा हा इंग्लंडमधील 2000 नंतरचा दुसराच कसोटी विजय आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 313 धावा करून विंडीजसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. पाचव्या दिवशी विंडीजने हे आव्हान 6 विकेटच्या मोबदल्यात पार केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो ब्लॅकवूड. त्याने दुसऱ्या डावात वरच्या फळीची मोठी पडझड झाली असताना 95 धावांची झुंजार खेळी करत वेस्ट इंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले. त्याला रोस्टन चेसने 37 धावा करून उत्तम साथ दिली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 तर कर्णधार बेन स्टोक्सने 2 विकेट घेतल्या. 

इंग्लंडने सामना जिंकण्यासाठी ठेवलेल्या 200 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजला जोफ्रा आर्चरने जोरदार धक्के दिले. त्याने विंडीजच्या अवघ्या 7 धावा झालेल्या असताना सलामीवीर क्रेग ब्रेथवेट ( 4 ) त्यानंतर ब्रुक्सला शुन्यावर बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. तर दुसरा सलामीवीर जॉन कॅम्पबेलला जायबंदी झाल्याने मैदान सोडावे लागले. त्यानंतर मार्क वूडने 9 धावांवर खेळणाऱ्या शाय होपचा त्रिफळा उडवून विंडीजला तिसरा धक्का दिला. सुरुवातीलाच तीन धक्के मिळालेल्या विंडीजची उपहारापर्यंत 15 षटकात 3 बाद 35 धावा अशी बिकट अवस्था झाली होती. 

पण, उपहारानंतर रोस्टन चेस आणि ब्लॅकवूडने विंडीजचा डाव सावरला. या दोघांनी विंडीजची पडझड रोखून टार्गेटचा पाठलाग करणे सुरु केले. चेस आणि ब्लॅकवूडने विंडीजला 35 व्या षटकात 100 धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागिदारी रचली. परंतु जोफ्रा आर्चरने ही धोकादायक ठरु पाहणारी जोडी फोडली आणि विंंडीजला चौथा धक्का दिला. त्याने रोस्टन चेसला 37 धावांवर बाद केले. 

चेस बाद झाल्यानंतर विंडीजच्या डावाची सुत्रे ब्लॅकवूडने आपल्या हातात घेतली. त्याने शेन डॉरिच याला साथीला घेत भागिदारी रचण्यास सुरुवात केली. दरम्यान, ब्लॅकवूडने आपले झुंजार अर्धशतक पूर्ण केले. त्याने ़डॉरिचबरोबर पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी रचली. दरम्यान, ब्लॅकवूड आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. ही जोडी विंडीजला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने डोरिचला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर स्टोक्सने शतकासाठी अवघ्या 5 धावा राहिलेल्या ब्लॅकवूडलाही बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला. पण, तोपर्यंत ब्लॅकवूडने विंडीजला 189 धावांपर्यंत आणून ठेवले होते.

विंडीजला आता फक्त विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्यावेळी जायबंदी झालेला सलामीवीर कॅम्पबेल कर्णधार जेसन होल्डरसोबत फलंदाजीला आला. या दोघांनी 64 व्या षटकात विजयाची औपचारिक्ता पार पाडली. 

दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या डावात डॉमिनिक सिब्ले ( 50)  आणि झॅक क्रोव्हली ( 76 ) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 313 धावांपर्यंत मजल मारली. या दोघांना रोरी बर्न्स ( 42 ) आणि बेन स्टोक्स ( 46 ) यांनी चांगली साथ दिली. त्यांनतर तळातील फलंदाज जोफ्रा आर्चरने 23 धावांची खेळी करत इंग्लंडला आघाडी वाढवण्यासाठी महत्वपूर्ण हातभार लावला. 

तत्पूर्वी इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 204 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 318 धावा केल्या. त्यामुळे विंडीजने इंग्लंडवर 114 धावांची आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या डावात इंग्लंडने 313 धावा केल्याने विंडीजसमोर सामना जिंकण्यासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान विंडीजने 4 विकेट राखून पार केले. विंडीजकडून ब्लॅकवूडने 95 धावांची झुंजार खेळी केली तर रोस्टन चेसने 37 धावांची खेळी करुन त्याला चांगली साथ दिली.