देवदत्त पडिक्कल टीम इंडियाच्या दरवाजावर मारतोय धडका!

Last Updated: Mar 08 2021 4:28PM
Responsive image
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आयपीएल पदार्पणाच्या वर्षातच आरसीबीच्या देवदत्त पडिक्कलने तब्बल ५ अर्धशतके ठोकत ४७३ धावा केल्या. त्याचवेळी हा १९ वर्षाचा डावखुरा शैलीदार फलंदाज भारतीय संघात कधी येणार अशी विचारणा होऊ लागली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी - २० मालिकेसाठीही त्याचे नाव चर्चेत आले होते. पण, त्यावेळी त्याला संधी मिळाली नाही. आता त्याने पुन्हा एकदा धावांची रतीब घालत आपल्या नावाची चर्चा घडवून आणली आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत सलग चौथे शतक ठोकत आपण, मोठ्या खेळी सातत्याने करुन शकतो हे दाखवून दिले. 

विजय हजारे ट्रॉफीतील दिल्लीत खेळल्या गेलेल्या केरळ विरुद्ध कर्नाटक उपांत्य पूर्व सामन्यात कर्नाटकचा सलामीवीर पडिक्कलने आपले सलग चौथे शतक ठोकले. प्रथम फलंदाज करणाऱ्या कर्नाटकने देवदत्त पडिक्कल आणि रवीकुमार समर्थ यांनी २४९ धावांच्या दिलेल्या सलामीच्या जोरावर ३ बाद ३३८ धावांचा डोंगर रचला. पडिक्कलने १०१ धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार असलेल्या समर्थने तडाखेबाज १९२ धावा केल्या.

देवदत्त पडिक्कलने विजय हजारे ट्रोफीत यापूर्वी आडिसा ( १५२ ), केरळ (१२६ ) आणि रेल्वेविरुद्ध ( १४५ ) शतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे केरळमध्ये जन्मलेल्या पडिक्कलने केरळ विरुद्धच स्पर्धेत दोन शतके ठोकली. पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंत सहा सामन्यात ६७३ धावा केल्या आहेत. 

देवदत्त पडिक्कलपूर्वी एकाच स्पर्धेत चार शतके ठोकण्याची कामगिरी कुमार संगकारा आणि अल्विरो पिटरसन यांनी केली होती. कुमार संगकाराने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये सलग ४ शतके ठोकली होती. तर दक्षिण आफ्रिकेच्या अल्विरो पिटरसनने २०१५ - १६ मध्ये झालेल्या मोमेंटम एकदिवसीय चषकात चार शतके ठोकली होती.