धोनी : लाईमलाईटपासून दूर... पण

Last Updated: Jul 07 2020 3:11PM
Responsive image

धनश्री ओतारी


सर्वांचा क्रिकेट जगतातला लाडका माही आज ३९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात महेंद्र सिंग धोनी ३१ बॉल्समध्ये ४१ धावांवर धावबाद झाला आणि एखादी नदी लुप्त होते तसा तोही मैदानातून लुप्त झाला. मात्र, मीडियाच्या विश्वात तो कायम राहिला. पण या वाक्यात कुठेतरी गफलत वाटते. कारण धोनी स्वतःहून कधीच मीडियात राहिला नाही तर तो सध्या काय करतोय? या एका प्रश्नाने तो आपसूकच लाईमलाईटमध्ये आला. 

लाईमलाईटपासून दूर असला तरी नेहमी चर्चेत राहणारा खेळाडू म्हणजे महेंद्र सिंह धोनी. मागीलवर्षी झालेल्या वर्ल्डकपनंतर धोनीने स्वतःला स्वतःच्याच विश्वात वाहून घेतले. पण संयमी खेळामुळे टीकेचा धनी ठरलेला धोनी सध्या काय करतोय? या प्रश्नाने मीडियानेच त्याला लाईमलाईटपासून दूर जावून दिलेले नाही हे नक्की. 

इतरांप्रमाणे धोनीचे देखील सोशल मीडियावर अकाऊंट्स आहेत. लाखो फॉलोअर्स आहेत. पण त्याने कधी स्वतःला आकिर्षत करण्यासाठी कोणतेच प्रयोग केले नाहीत. इतर खेळाडूंप्रमाणे त्याला सोशल मीडियावरून खुप काही करता आले असते. दिवसाला खूप ट्विट, चाहत्यांशी संवाद वगैरे पण तसे काहीच नाही करत.

गेल्या सहा महिन्यात फक्त तीन ट्विट, फेसबुकवर मोजून दहाएक पोस्ट इन्स्टावरही तसेच काहीसे पाहायला मिळत. सोशल मीडियावरही तो कूल राहतो.  हा त्याचा मुळचा स्वभावच म्हणावा लागेल. 

वयाच्या २३ व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आणि त्यानंतर 'कॅप्टन कुल' म्हणून त्याने जगभरात नाव कमावले. त्याच्या या कुल स्वभावामुळेच मीडियाचे पाय आपसूकच त्याच्याकडे वळतात असे म्हणायला हरकत नाही.

तसे पाहायला गेले तर महेंद्र सिंह धोनी पहिल्यापासून लाईमलाईटपासून दूर राहात आला आहे. कर्णधार म्हणून पत्रकार परिषदेमध्येही खूप कमी बोलला आहे. कोणी कितीही टीका केली किंवा कौतुकाचा वर्षाव केला तरी प्रत्येकाला तो उत्तर नेहमी संयम बाळगत आपल्या कृतीतून देत असतो. त्याचा हाच संयम नेहमी प्रेरणादायी ठरत आला आहे आणि हाच त्याचा प्रेरणादायी स्वभाव त्याला कदाचित लाईमलाईटमध्ये राहण्यास भाग पाडत असेल. 

काही महिन्यापूर्वी बीसीसीआयने करार यादी जाहीर केली. मात्र यामध्ये धोनीला वगळण्यात आले होते. बीसीसआयच्या भूमिकेवर धोनीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याच्या चाहत्यांनी त्याला  #thankyoudhoni या ट्रेंडने टॉपवर ठेवले.

 धोनीच्या ३९ व्या वाढिदिवसानिमित्त धोनीचा लाडका सहकारी केदार जाधवने लिहिलेल्या भावनिक पत्राच्या शेवटी 'अभी न जाओ छोड़कर, के दिल अभी भरा नहीं' असे म्हटले आहे. अगदी तसेच धोनीचे चाहतेदेखील त्याला असे म्हणत लाईमटाईमध्ये जागे ठेवत आहेत, याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. 

एकिकडे मायदेशात अनेकांकडून त्याच्यावर सतत टीकेची झोड उठत आहे  तर दुसरीकडे परदेशातील अनेक खेळाडूंच्या तोंडी केवळ धोनीचे नाव असल्याचे पाहायला मिळत आहे. पण या सर्व गोष्टी सुरू आहेत त्या केवळ धोनीच्या  लाईमटाईमध्ये. खऱ्या जीवनात तो दुसऱ्याच विश्वात आहे. 

त्याच्या विश्वातून तो कधी बाहेर पडणार आणि तो मैदानात पुन्हा कधी हेलिकॉप्टर शॉट मारणार, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते डोळ्यात तेल घालून बसले आहेत. आणि ही संधी केवळ आयपीएलमध्ये मिळू शकते. असा चाहत्यांना विश्वास आहे. चाहत्यांच्या याच विश्वासामुळे धोनी लाईमलाईटपासून दूर राहू शकत नाही हे नक्की.