Fri, Apr 23, 2021 14:55
आयपीएलवर कोरोनाचे सावट

Last Updated: Apr 07 2021 10:22PM

चेन्नई : वृत्तसंस्था

आयपीएलचे 14 वे सत्र सुरू होण्यास आता केवळ दोन दिवस बाकी असतानाच स्पर्धेवरील कोरोनाचे सावट आणखी गडद होताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय या टी-20 लीगमध्ये खेळणारे खेळाडू व अन्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडणे  सातत्याने सुरूच आहे. कोरोनाने बलाढ्य मुंबई इंडियन्सला धक्का दिल्याची घटना ताजी असतानाच आता  कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सलामी फलंदाज पडिक्कल कोरोनाबाधित झाल्यानंतर संघातील स्टार ऑलराऊंडर डॅनिएल सॅम्सचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला आयपीएलच्या 14 व्या सत्रास सुरुवात होण्यापूर्वीच हा जबर धक्का बसला आहे. या संघाची सलामीची लढत 9 एप्रिल रोजी पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणार्‍या मुंबई इंडियन्सविरुद्ध होत आहे. मात्र, आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डॅनिएल सॅम्स हा बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

आरसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॅनिएल सॅम्स हा 28 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू 3 एप्रिल रोजी भारतात दाखल झाला होता. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याची 7 एप्रिल रोजी पुन्हा कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सॅम्समध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसली, तरी तो सध्या क्वारंटाईन आहे. दरम्यान, आरसीबीची मेडिकल टीम सॅम्सच्या संपर्कात असून त्याच्या प्रकृतीवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे.   सॅम्सने आतापर्यंत आयपीएलचे तीन सामने खेळले आहेत.

क्वारंटाईननंतर पोलार्डमुंबई इंडियन्समध्ये दाखल

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरोना पोलार्ड हा सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला आहे. पोलार्डच्या नजीकच्या सूत्रांनी हा अष्टपैलू खेळाडू चेन्नईमध्ये आपल्या फ्रँचाईजी संघात दाखल झाल्याची पुष्टी केली आहे. त्याने कोरोना नियमावलीनुसार सात दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केला आहे.

कोरोनामधून सावरल्यानंतर पडिक्कल आरसीबीसोबत

युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल कोरोनामधून सावरला असून संघाच्या जैव सुरक्षित वातावरणात सहभागी झाला आहे, अशी माहिती आरसीबीने दिली. पडिक्कलची 22 मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तो आयसोलेशनमध्ये होता. पडिक्कलने गेल्या सत्रात 473 धावा केल्या होत्या.