Fri, May 29, 2020 00:09होमपेज › Sports › ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय, पाकची बांगला देशपेक्षाही खराब कामगिरी

ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय, पाकची बांगला देशपेक्षाही खराब कामगिरी

Last Updated: Dec 03 2019 1:18AM
अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था

अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 1 डाव आणि 48 धावांनी बाजी मारली. पहिल्या डावात 589 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांवर संपवला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन देत, ऑस्ट्रेलियाने पाकचा दुसरा डावही 239 धावांवर संपवत मालिकेत 2-0 असा विजय मिळवला.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपली अ‍ॅशेस मालिकेतली खराब कामगिरी बाजूला ठेवत दमदार पुनरागमन केले. पहिल्या डावात वॉर्नरने नाबाद त्रिशतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले त्रिशतक ठरले. त्याने नाबाद 335 धावांची खेळी केली. त्याला मार्नस लाबुशेनने 162 धावा करीत भक्कम साथ दिली. पहिल्या डावात शाहिन आफ्रिदीचा अपवाद वगळता एकाही पाकिस्तानी गोलंदाजाला यश मिळाले नाही.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची पहिल्या डावात 6 बाद 96 अशी घसरगुंडी उडाली असताना बाबर आझमच्या 97 धावा आणि अष्टपैलू यासिर शाहने झळकावलेले शतक या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात 302 धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्कने 6 बळी घेत पाकच्या संघाचे कंबरडे मोडले. कर्णधार टीम पेनेने पाकिस्तानला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.

दुसर्‍या डावातही पाकची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शान मसूद आणि मधल्या फळीत असद शफिकने अर्धशतकी खेळी करीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. पाकिस्तानकडून दुसर्‍या डावात शान मसूद (68) आणि असद शफिक (57) यांनी संघर्ष केला. शेवटी 239 धावांवर पाकिस्तानचा दुसरा डाव संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने 1 डाव 48 धावांनी सामन्यात बाजी मारली. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने 5 तर जोश हेझलवूडने 3 बळी घेतले.

पाकची बांगला देशपेक्षाही खराब कामगिरी, ऑस्ट्रेलियात सलग चौदावा पराभव

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियातील हा सलग 14 वा कसोटी पराभव आहे आणि एका देशात सलग सर्वाधिक कसोटी सामने हरणार्‍या संघात पाकिस्तान अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यांनी बांगला देशचा सलग 13 कसोटी पराभवांचा विक्रमही मोडला.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी भरारी

ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या कसोटीतही पाकिस्तानला डावाने पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची कसोटी जिंकली. या विजयासह त्यांनी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपल्या खात्यात आणखी 120 गुणांची भर घातली. भारतीय संघ 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाने पाकला नमवून मोठी भरारी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया आणि त्यांच्यातील गुणांचे अंतर कमी केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 176 गुण झाले आहेत. भारतीय संघाने वेस्ट इंडिज (2-0), दक्षिण आफ्रिका (3-0) आणि बांगला देश (2-0) यांच्यावर मात केली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताने आतापर्यंत सर्वच्या सर्व सात सामने जिंकले आहेत. या गुणतालिकेत अपराजित राहिलेला हा एकमेव संघ आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एका मालिकेला 120 गुण दिले जातात आणि भारताने तीनही मालिका जिंकून 360 गुण खात्यात जमा केले आहेत.