Wed, Apr 01, 2020 23:22होमपेज › Sports › Australia Open : फेडरर, सेरेनाची आगेकूच

Australia Open : फेडरर, सेरेनाची आगेकूच

Last Updated: Jan 20 2020 9:32PM
मेलबर्न : वृत्तसंस्था 

सेरेना विल्यम्स, रॉजर फेडरर व नाओमी ओसाका यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आगेकूच केली. मात्र, यानंतर झालेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. यापूर्वी जंगलाला लागलेल्या आगीमुळे चर्चेत असलेल्या ऑस्ट्रेलियानंतर वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये देखील अनेक सामने पावसामुळे झाले नाहीत. 

धुक्याच्या वातावरणामुळे गेल्या आठवड्यात पात्रता फेरीदरम्यान अनेक खेळाडूंना खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत होता त्यामुळे स्पर्धेचे आयोजन उशिरा होईल असे वाटत होते. हवेची गुणवत्ता चांगली असल्याने स्पर्धेचा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सुरू झाला; पण चार तासानंतर झालेल्या पावसामुळे बाहेरील कोर्टवर खेळ थांबविण्यात आला.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने रॉड लेव्हर अरिनाचे छप्पर बंद करण्याच्या वेळी कोर्टाच्या बाहेर पाऊस होता. त्याने पुनरागमन करीत अमेरिकेच्या स्टिव्ह जॉन्सनला 6-3, 6-2, 6-2 असे पराभूत केले. मार्गरेट कोर्ट अरिना व मेलबर्न अरिना यातील छप्पर बंद केल्याने खेळ सुरू राहिला. मंगळवारी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवल्याने सामने प्रभावित होऊ शकतात. पहिल्याच दिवशी पावसामुळे 64 पैकी 48 सामने मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले.

दरम्यान, 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरलेल्या सेरेना विल्यम्सने जोरदार सुरुवात केली. तर, गेल्या वर्षी स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी नाओमी ओसाकाने सुद्धा सरळ सेटमध्ये विजय मिळवत दुसर्‍या फेरीत धडक मारली. सेरेनाने रशियाच्या एनेस्ताशिया पोटापोव्हाविरुद्ध पहिला सेट 19 मिनिटांमध्ये जिंकला व केवळ 58 मिनिटांमध्ये सामना 6-0, 6-3 असा आपल्या नावे केला.सेरेनाची मोठी बहीण व्हिनसला 15 वर्षीय कोको गॉफकडून 7-6 (7-5), 6-3 असे पराभूत व्हावे लागले. ओसाकाने चेक प्रजासत्ताकच्या मेरी बोजकोव्हाला 80 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-2, 6-4 असे नमविले. कॅरोलीन व्होजनियाकीने डेन्मार्कच्या बिनमानांकित अमेरिकेच्या ख्रिस्टी एनला 6-1, 6-3 असे नमविले.

पुरुष गटात कॅनडाचा युवा खेळाडू 13 वा मानांकित डेनिस शापोवालोवला पहिल्या फेरीत बाहेरचा रस्ता दाखवला. त्याला हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने 6-3, 6-7 (7-9), 6-1, 7-6 (7-3) असे नमविले. इटलीच्या आठव्या मानांकित माटियो बेरेटिनी व अर्जेंटिनाचा 22 वा मानांकित गुईडो पेला यांनी दुसरी फेरी गाठली; पण क्रोएशियाच्या 24 व्या मानांकित बोर्ना कोरिचला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. बेरेटिनीने ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू हॅरिसला 6-3, 6-1, 6-3 असे तर, पेलाने स्थानिक खेळाडू जॉन पॅट्रिक स्मिथला 6-3, 7-5, 6-4 असे नमविले.  बिगरमानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीने कोरिचला 6-3, 6-4, 6-4 असे पराभूत केले.

महिला गटातील पहिल्या फेरीत मानांकित खेळाडूंनी सहज विजय मिळवला. अमेरिकेच्या 14 व्या मानांकित सोफिया केनिनने इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसानला 6-2, 6-4, असे तर, क्रोएशियाच्या 13 व्या मानांकित पेट्रा मार्टिचने अमेरिकेच्या ख्रिस्टिना मॅकहालेला 6-3, 6-0 असे आणि इकटेरिना अलेक्सांद्रोवाने स्वित्झर्लंडच्या जिल टीचमॅनला 6-4,4-6, 6-2 असे पराभूत केले.

गुणेश्वरनचा सामना पावसामुळे पुढे ढकलला 

भारताचा आघाडीचा टेनिस खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरनचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जपानच्या तात्सुमा इटोविरुद्धचा पहिल्या फेरीतील सामना आता मंगळवारी होणार आहे. पात्रता फेरीत पराभूत होऊनदेखील नशिबाच्या जोरावर पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत स्थान मिळवणार्‍या जागतिक क्रमवारीत 122 व्या स्थानी असलेल्या प्रज्ञेशचा सामना ठरलेल्या वेळेनुसार सोमवारी होणार होता. प्रज्ञेशने पहिल्या फेरीत विजय मिळवला. तर, दुसर्‍या फेरीत त्याचा सामना दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचशी होऊ शकतो.