सिडनी : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौर्यावर आहे. या दौर्यात दोन्ही संघांदरम्यान क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांतील मालिका रंगणार आहेत. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्याची सुरुवात शुक्रवारी सिडनीत होणार्या पहिल्या वन-डे सामन्याने होणार आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये विराटला समतोल ‘प्लेईंग इलेव्हन’ची निवड करावी लागणार आहे. सलामीला ‘गब्बर’ शिखर धवनसोबत मयंक अग्रवाल खेळण्याची शक्यता आहे.
27 नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून पहिल्या वन-डेस सुरुवात होणार आहे. या सामन्यात जखमी रोहितच्या स्थानावर मयंक अग्रवाल डावाची सुरुवात करण्यास मैदानात उतरू शकतो. याशिवाय विराटच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये के. एल. राहुलला संधी मिळू शकते. मात्र, तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. कारण, संघात यष्टिरक्षक ऋषभ पंत नाही.
याशिवाय ‘रनमशिन’ विराट कोहली तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करेल. यामुळे चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरचे स्थान निश्चित मानले जात आहे. तर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या फलंदाजी करेल. मात्र, तो गोलंदाजी करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी ऑलराऊंडर रवींद्र जडेजासह मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि बुमराह यांच्यावर असेल. यामध्ये जास्त बदल दिसण्याची शक्यता कमीच आहे.
ऑस्ट्रेलियात निराशाजनक कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपर्यंत एकूण 140 वन-डे लढती झाल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 78 विजय मिळविले आहेत. तर, भारताने 52 लढतींमध्ये बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या मायभूमीत भारताविरुद्ध एकूण 51 वन-डे सामने खेळताना 36 विजय मिळविले आहेत. दुसरीकडे भारताला केवळ 13 विजय मिळविता आले आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाला नमविणे भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. प्रत्येक विजयासाठी टीम इंडियाला संघर्ष करावा लागला आहे.
दिलासा देणारा मालिका विजय
2018-19 च्या दौर्यात कोहली आणि कंपनीने गेल्या दौर्यात फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला 2-1 अशा फरकाने धूळ चारली होती. मात्र, या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे एक वर्षाच्या निलंबन कारवाईमुळे खेळू शकले नाहीत. यामधील एकट्या स्टिव्ह स्मिथने भारताविरुद्धच्या आठ सामन्यांत 2 शतके व दोन अर्धशतकांसह 467 धावांचा पाऊस पाडला आहे. वॉर्नरने 391 धावांचे योगदान दिले आहे.