पाकची आज आणखी एक ‘कसोटी’

Published On: Jun 26 2019 1:54AM | Last Updated: Jun 26 2019 1:54AM
Responsive image


बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर विश्‍वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तान संघाचा सामना बुधवारी न्यूझीलंडशी होणार आहे. भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला रोषाला सामोरे जावे लागले. यानंतर पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेला गेल्या सामन्यात 49 धावांनी पराभूत केले. पाकिस्तान संघ दोन विजय व तीन पराभवानंतर पाच गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासोबत इतर सामन्यांच्या निकालांवर देखील लक्ष ठेवावे लागणार आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजीची जबाबदारी ही जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरवर असणार आहे. त्याने 15 विकेटस् घेतल्या आहेत. पहिल्या सामन्यानंतर बाहेर गेलेल्या हॅरिस सोहेलने गेल्या सामन्यात 59 चेंडूंत 89 धावा केल्या. शादाब खान व वहाब रियाज याने गेल्या सामन्यात तीन. तर, आमीरने दोन विकेटस् मिळवल्या. त्यामुळे या सामन्यातदेखील त्यांच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल.

दुसरीकडे न्यूझीलंडने आतापर्यंत आपला विजयी फॉर्म कायम ठेवला आहे. कर्णधार केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या न्यूझीलंड संघाने चमक दाखवली आहे. विल्यम्सनने स्वत: दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. रॉस टेलरदेखील चांगल्या फॉर्मात आहे; पण कॉलिन मन्‍रो व मार्टिन गुप्टिल यांना सूर गवसलेला नाही. ट्रेंट बोल्ट व लॉकी फर्ग्युसन चांगल्या फॉर्मात आहेत. याशिवाय जिमी नीशम व कोलिन-डी-ग्रँडहोम संघाच्या कामगिरीत योगदान देत आहे.

भारताकडून हरल्यानंतर जीव द्यावा,असे वाटले होते : पाक प्रशिक्षक

विश्‍वचषक स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात भारताने जेव्हा पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटली होती, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी व्यक्‍त केला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला सामना म्हणजे एखाद्या युद्धासारखाच असतो. हा सामना भारताने जिंकला. मात्र, हा सामना भारताने जिंकल्यावर मला जीव द्यावासा वाटत होता, असे मिकी आर्थर यांनी म्हटले आहे.  एका व्हिडीओमध्ये ऑर्थर म्हणतात की, रविवारी दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने विजय मिळवला. ही बाब माझ्यासाठी समाधानकारक आहे. तरीही जेव्हा आम्ही भारतासोबत सामना हरलो तेव्हा संघावरचे दडपण वाढले होते. मला वाटले होते की आत्महत्या करावी, असेही आर्थर यांनी म्हटले आहे.