Fri, Sep 25, 2020 13:28होमपेज › Soneri › कराची विमान दुर्घटना : 'या' अभिनेत्रीची पतीसह मृत्यूची अफवा!  

कराची विमान दुर्घटना : 'या' अभिनेत्रीची पतीसह मृत्यूची अफवा!  

Last Updated: May 23 2020 12:07PM

संग्रहित छायाचित्र - दानिश तैमूर आणि आयजा खानकराची (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) पीके-८३०३ हे विमान शुक्रवारी (दि. २३) कराचीतील जिना विमानतळाजवळील दाट लोकवस्तीत कोसळले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून सुमारे ९९ जण होते. यातील ९७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोघांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान आणि तिचे पती दानिश तैमूरचे निधन झाल्याचे वृत्त व्हायरल झाले. परंतु, नंतर आयजा खानने ही केवळ अफवा असल्याचे म्हटले. 

हे विमान लाहोर वरून कराचीला येत होते. हे विमान विमानतळावरील धावपट्टीवर उतरण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर मॉडेल कॉलनी या रहिवाशी वस्तीवर कोसळले.

आपल्या निधनाच्या बातम्या पाहून आयजा खानने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली की, 'कृपया खोटी माहिती पसरवणे बंद करा. परमेश्वर अशा लोकांना सुबुध्दी देवो, जे विना कन्फर्मेशन काहीही स्टेट्स लिहितात. या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्यांच्या घरच्या सदस्यांना परमेश्वर धीर देवो.' नंतर आयजाने आपली ही पोस्ट डिलीट केली. 

दानिश तैमूरनेदेखील एक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्याने लिहिलं, 'आम्ही सुरक्षित आहोत आणि आमच्या घरी आहोत. परमेश्वर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांना शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती आणि धैर्य देवो.'

आयजा खानने, अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कोई चांद रख, तुम कौन पिया, अधूरी औरत, प्यारे अफजल, यारिया, मेरी जिंदगी है तू, सारी भूल हमारी थी, कही अनकही यासारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 

वैमानिकाचे 'ते' शेवटचे शब्द

पाकिस्तानातील मीडियांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचे वैमानिक कॅप्टन सज्जाद गुल होते. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाचा विमान वाहतूक नियंत्रकाशी संवाद झाला होता. विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या असल्याची माहिती वैमानिकाने दुर्घटनेपूर्वी विमान वाहतूक नियंत्रकांना दिली होती. त्यानंतर दोन धावपट्ट्या विमान उतरवण्यासाठी उपलब्ध असल्याचे वैमानिकाला सांगण्यात आले होते. मात्र, विमान धावपट्टीवर उतरवण्यापूर्वी काही क्षणातच ते मॉडेल कॉलनीच्या लोकवस्तीत कोसळले. विमानाचे इंजिन निकामी झाले आहे, असे वैमानिकाचे शेवटचे शब्द होते.

 "