कोल्‍हापुरच्या कलानगरीतला कौतुक सोहळा आणि लतादीदी

Published On: Sep 27 2019 2:53PM | Last Updated: Sep 28 2019 8:11AM
Responsive image
त्यावेळी लतादीदी कोल्‍हापुरातील एमएलजी हायस्‍कूलमध्‍ये शिकत होत्‍या

संकलन - स्‍वालिया शिकलगार, कोल्हापूर 


चाळीसच्या दशकापासून ज्यांचा आवाज संगीत क्षेत्रात घुमतो आहे, अशा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबरला वाढदिवस. मुलगी गळ्‍यात गंधार घेऊन जन्‍मली आहे. ही फार मोठी होईल. नाव मिळवेल, हे उद्‍गार आहेत लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे. ते स्‍वत: अभिजात गायक होते. परवशता पाश दैवी हे त्‍यांचे नाट्‍यगीत अमर कीर्तीचे आहे. त्‍यांची स्‍वत:ची बलवंत कंपनी होती. तसेच चित्रपट संस्‍थाही त्‍यांनी स्‍थापन केली. परंतु, १९३२ च्‍या बोलपटांच्‍या झंझावातात त्‍यांचे नाट्‍यतेज झाकोळले आणि त्‍यांची सिनेमा कंपनीही अयशस्‍वी झाली. 

लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही भावंडे. १९४१ मध्‍ये सांगलीत दीनानाथ यांचं निधन झालं. त्‍यानंतर मंगेशकर कुटुंब कोल्‍हापुरात आले. कोल्‍हापुरातील खरी कॉर्नरला बाबूराव पेंटर यांच्‍या घराजवळ मंगेशकर कुटुंब राहायचे. लतादिदी काही दिवस भवानी मंडपाजवळील जुन्‍या वाड्‍यातील एमएलजी हायस्‍कूलमध्‍ये शिकत होत्‍या. त्‍यांची अंगकाठी सडपातळ होती. त्‍या कबड्‍डी आणि खो-खो चांगल्‍या खेळायच्‍या. असा संदर्भ बाबुराव धारवाडे यांच्‍या जुनं कोल्‍हापूर या पुस्‍तकात सापडतो. 

लताजींना २५ रूपयांचे बक्षीस 

त्‍यावेळी कोल्‍हापुरात मास्‍टर विनायक यांची हंस पिक्‍चर्स कंपनी फार्मात होती. मास्‍टर विनायक यांनी लताजींना बोलावून घेतले आणि कंपनीसाठी काम करायची ऑफर दिली. त्‍या मॉबमध्‍ये, मुलींच्‍या मेळ्‍यात, नृत्‍यात आणि गायनाच्‍या स्‍पर्धेतही भाग घ्‍यायच्‍या. १९४१ रोजी पंजाबी चित्रपट खजांची गाणी प्रसिध्‍द होती. गायिका नूरजहाँने ती गायली होती. त्‍या चित्रपटांच्‍या गाण्‍यांची एक स्‍पर्धा राजाराम टॉकीजमध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यातील 'लौट गई पापन अंधी' असं काही तरी गाणे लोकप्रिय होते. ते लताजींनी खूप सुंदर गायले होते. त्‍यावेळी त्‍यांना २५ रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले होते. 

Related image

शमशाद बेगम यांच्या आवाजातल्या गाण्यांनी "खजांची' चित्रपट सुपरहिट ठरला. यातल्या "सावन के नजारे हैं अहा अहा' या गाणं हिट ठरलं होतं. त्यावेळी पुण्यात या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ग्लोब थिएटरमध्ये नवोदित कलाकारांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बारा वर्षांच्या लतानं भाग घेऊन 'खजांची'मधील गाणं गाऊन पहिला क्रमांक मिळवला होता. 

लता मंगेशकर या ताऱ्याचा उदय होण्यापूर्वी ज्या गायिकांची आपली संगीत कारकिर्द फुलवली होती, त्यापैकी एक शमशाद बेगम होत्या. 

पुण्‍यात स्‍थलांतर 

दरम्‍यानच्‍या काळात विनायकरावांनी पुण्‍यास स्‍थलांतर केले. तेथे त्‍यांनी आचार्य अत्रे, राजगुरू आदींच्‍या सहकार्याने युग फिल्‍म कंपनी प्रा. लि. ही संस्‍था काढली. दामुअण्‍णा मालवणकर, मीनाक्षी, विष्‍णूपंत जोग, सहाय्‍यक दिग्‍दर्शक दिनकर द. पाटील, माधव शिंदे, वसंत शेळके यांच्‍यासोबत लतादिदींनाही त्‍यांनी पुण्‍यात नेले. तेथे 'सरकारी पाहुणे,' 'पहिली मंगळागौर' हे चित्रपट काढले. त्‍यात लता यांनी 'आम्‍ही वळिखले गं' हे गाणे परकर पोलक्‍यात नाचत बागडत गायले होते. विनायकराव परत कोल्‍हापुरात आले. येथे त्‍यांनी शालिनी स्‍टुडिओत प्रफुल्‍ल पिक्‍चर्स संस्था काढली. त्‍यामुळे लताजी पुन्‍हा कोल्‍हापुरात आल्‍या. 

Related image

पार्श्वगायनाची संधी 

संगीत दिग्‍दर्शक दत्ता डावजेकर यांनी लताजींना पार्श्वगायनाची संधी दिली. विनायकरावांनी पुन्‍हा मुंबईस प्रफुल्‍लचे स्‍थलांतर केले. विनायकरावांनी येथे मोठे चित्रपट काढले. त्‍यांनी आपल्‍या चित्रपटात गोड गळ्‍याची अभिनेत्री नूरजहाँ यांना काम दिले. 

लता आणि नूरजहाँ यांचा परिचय 

नूरजहाँ आणि लता यांचा परिचय चित्रपटातूनच झाला. पार्श्वगायिका म्‍हणून लताजींना मुंबईत प्रसिध्‍दी मिळाली होती. राजकपूर यांच्‍या 'बरसात'मधील 'हवा में उडता जाये,' 'आवारा'मधील 'घर आया मेरा परदेशी' या गाण्‍यांनी लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. मेहबूब यांच्‍या 'अंदाज' चित्रपटात संगीत दिग्‍दर्शक नौशाद यांनी लताबाईंच्‍या आवाजाचे सोने करून घेतले होते. तसेच संगीत दिग्‍दर्शक खेमचंद्र प्रकाश यांनी 'महल'मधील 'आयेगा, आयेगा आनेवाला' हे गाणे प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलं. नंतर सी. रामचंद्र यांच्‍याबरोबर काम केले. 'अनारकली' चित्रपटातील 'ए जिंदगी उसी की है'ने सिनेरसिकांना मोहून टाकलं.

Image result for lata mangeshkar kolhapur

कोल्‍हापुरात कौतुक सोहळा 

लताबाईंच्‍या या सर्व यशाचे कोल्‍हापुरकरांना अभिमान वाटला. कोल्‍हापुरकरांनी लताजींना अक्षरश: डोक्‍यावर घेतले. भालजी पेंढारकर यांनी मदनमोहन लोहियांच्‍याकरवी लताजींचा सत्‍कार करायचे ठरवले. लता मंगेशकर यांच्‍या पार्श्वगायनाचा रौप्‍यमहोत्‍सव कलानगरीत करण्‍याचे ठरले. १९६७ चे हे वर्ष. शाहू खासबाग कुस्‍त्‍यांच्‍या मैदानात संध्‍याकाळी सत्‍कार सोहळा झाला. गर्दीने मैदान तुडूंब भरले होते. भाई एम. के. जाधव नगराध्‍यक्ष होते. दिनकरराव यादव जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष, विख्‍यात कादंबरीकार आणि मा. विनायकांच्‍या कुटुंबातले ज्‍येष्‍ठ सदस्‍य वि. स. उर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार झाला. नगराध्‍यक्षांनी भाषण केले. ते म्‍हणाले, 'लताचा गळा म्‍हणजे ईश्‍वरी लेणे आहे. ते क्‍वचितच कुणाला तरी लाभते. ते त्‍यांना त्‍यांच्‍या पित्‍यांच्‍या वारशाने आणि पुण्‍याईने लाभले आहे. लतादीदींच्‍या आवाजाने सारं कोल्‍हापूर 'लता'मय झाले.'  


 अंबरनाथ बदलापूर रेल्वे मार्गावर अपघात; एका कामगाराचा मृत्यू, वाहतूक विस्कळीत


Farmers Protest Violence : हिंसाचारात १५० हून अधिक पोलिस जखमी, दोघांची प्रकृती गंभीर


'त्यांनी' तुझा आणि माझाही विश्वासघात केला; शीतल आमटेंच्या पतीची भावूक पोस्ट 


जळगाव : फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून गंडविणारा गजाआड


आंदोलकांचा दिल्ली पोलिसांना कोंडीत पकडत 'लाठीहल्ला' (Video)


पोलिसांच्या गोळीने नाही, तर ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; सीसीटीव्हीतून झाले स्पष्ट


उसाच्या फडाची आग विझवताना एकाचा मृत्यू


निपाणीत प्रजासत्ताकदिनी ११२ क्रमांकाच्या वाहनाचे लॉन्चिंग!


मोठी बातमी! शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल सुरू होणार


दिल्ली-लखनौतील सोने तस्करी प्रकरणातील ८ पैकी ४ जण सांगली जिल्ह्यातील