कमलेश सावंत साकारणार स्वातंत्र्य सेनानी

Last Updated: Jan 22 2020 6:12PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अनेक हिंदी मराठी चित्रपटातून लक्षवेधी अभिनय करणारे कमलेश सावंत स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बहुचर्चित शहीद भाई कोतवाल या चित्रपटात कमलेश यांनी शहीद गोमाजी पाटील ही भूमिका साकारली आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत. भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा ही यात पाहायला मिळणार आहे. 

शहीद भाई कोतवाल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र सेना स्थापन केली. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांन वीरमरण आलं. भाई कोतवाल यांच्यावर आधारित या चित्रपटात शहीद गोमाजी पाटील यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. एक स्फूर्तीदायक इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, अशी भावना कमलेश सावंत यांनी व्यक्त केली. शहीद भाई कोतवाल हा चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.