Mon, Aug 03, 2020 14:34होमपेज › Soneri › BycottDeepika हॅशटॅगचा परिणाम छपाकच्या बॉक्स ऑफिसवर ?

BycottDeepika हॅशटॅगचा परिणाम छपाकच्या बॉक्स ऑफिसवर ?

Last Updated: Jan 15 2020 1:31PM
धनश्री ओतारी

बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण हिचा नुकताच छपाक हा चित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी दीपिका छपाक चित्रपटावेळी कुठेतरी मागे पडली असल्याची जाणीव झाली. बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारखा हा देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलेच राज्य गाजवेल असे वाटले होते. परंतु हे एक अधुरे स्वप्न राहते की काय अशी भीती मनात सतत वाटू लागली.

दीपिकाच्या चित्रपटासोबत अभिनेता अजय देवगण याचा तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा चित्रपट प्रदर्शित झाला. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला छपाक हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनपटावर आधारित आहे. तर ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. दोन्ही चित्रपटाचे प्रमोशन दमदार पद्धतीने झाले. असे असले तरी प्रमोशनादरम्यान दीपिका चाहत्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसण्याऐवजी एका वेगळ्याच जाळ्यात फसली गेली. असे म्हणण्यामागचे कारणही तसेच आहे. कधीच, कोणत्याच राजकीय प्रकरणात सहभाग न घेणारी दीपिका अचानक जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उतरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या अन् सर्वत्र छपाक चित्रपटाची चर्चा न होता दीपिका जेएनयू अशी चर्चा सुरू झाली. 

हे ही वाचा► सोनाक्षीचा भन्नाट व्हिडिओ.... ओ स्त्री, चल दबंग हो जा!

मायानगरीतील अनेक सेलिब्रीटीजनी विद्यार्थ्यांचे समर्थन करत आंदोलनात सहभाग घेतला होता. परंतु  दीपिकाचा हा सहभाग अनेकांच्या पचनी पडला नाही. कारण अद्याप समजले नाही. परंतु बहुतांश लोकांचा समज असा झाला की ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिथे गेली. तर कोणी एकाने तिच्या जाण्याचा संबंध 'तुकडे गँग'शी जोडला इतकेच नव्हे तर ‘एक भारत तेरे तुकडे होंगे, इंशा अल्लाह इंशा अल्लाह’ अशा घोषणांना तुझा पाठिंबा आहे काय? असे सवाल देखील तिला करण्यात आले. #BycottDeepikaPadukone #Boycott_Chhapaak अशा हॅशटॅगला सुरूवात झाली. 

आपसूकच तिच्या चित्रपटाला राजकारणी वळण

जेएनयू विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभाग घेतल्याने काही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी दीपिकावर तीव्र नाराजी व्यक्त केली तर काही नेत्यांनी तिचे कौतुक केले. तिच्या या भूमिकेशी सहमत नसलेल्या मंडळींनी 'छपाक'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे छपाक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच माजलेला गोंधळ पाहता BycottDeepikaPadukone या हॅशटॅगचा परिणाम चित्रपटावर होतो की काय, अशी भीती होतीच. पण....

#BycottDeepikaPadukone याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवर ?

दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली ती केवळ तान्हाजी द अनसंग वॉरियर'ची. त्यामुळे छपाकची चर्चा कुठेतरी पाण्यात साखर विरघळावी तशी प्रेक्षकांच्या तोंडातून चर्चा निवळली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

छपाक  चित्रपटाचा एक आठवड्याचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट पाहता 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' च्या तुलनेत छपाक मागे पडला असल्याचे पाहायला मिळाले. आत्तापर्यंतचे छपाक चित्रपटाचे ऑडियन्स रेटिंग स्कोर 2.7 इतका तर तान्हाजी द अनसंग वॉरियर चित्रपटाचे ऑडियन्स रेटिंग स्कोर इतका  4.9 आहे. असे असले तरी कलेक्शन आणि ऑडियन्स रेटिंगवर अनेक प्रश्न उपस्थित होतात. 

कारण मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये छपाक चित्रपटाला १७०० आणि परदेशात ४६० स्क्रीन्स मिळाले आहे. म्हणजेच छपाकला एकूण २१६० स्क्रीन्स मिळाले आहेत. 

तर तान्हाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटाला भारतामध्ये ३८८० आणि परदेशात ६६० स्क्रीन्स मिळाले आहेत. एकूण ४५४० स्क्रीन्स या चित्रपटाला मिळाले आहेत. यासोबतच हा चित्रपट दोन भाषेत म्हणजेच हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटाचे स्क्रीनींग पाहता स्क्रीनिंगच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळते. 

इतकेच नव्हे तर छपाक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी  ऑनलाइन लीक झाला. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक केला. तामीळ रॉकर्सने पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाइक लीक करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही मरजावाँ, ड्रीम गर्स, भारत, कबीर सिंह, केसरी यांसारखे चित्रपट देखील ऑनलाईन लीक झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले होते. 

यासोबतच, तान्हाजी मालुसरे या नावाचे वलय 'छपाक'वर भारी पडले. ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भारतीयांवर नेहमीच प्रभाव राहिला आहे. त्यांच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात. ४०० वर्षांपूर्वी कोंढाणा किल्ल्यावर पराक्रम गाजवणारे तान्हाजी हे देखील असेच प्रेरणादायी वलयांकित नाव आहे आणि त्यांचे कर्तृत्व रुपेरी पडद्यावर पाहाण्यासाठी प्रेक्षक 'छपाक'च्या तुलनेत अधिक उत्सुक होते.

भारतीय प्रेक्षक स्त्रीप्रधान चित्रपटांच्या बाबतीत फारसे उत्साही दिसत नाहीत. कारण आपल्या देशात निर्माण होणाऱ्या जवळपास प्रत्येक चित्रपटात स्त्री पात्रे केवळ सहाय्यक कलाकाराच्याच भूमिकेत झळकताना दिसतात. 'मदर इंडिया', 'बँडिट क्विन', 'मर्दानी' असे काही अपवादात्मक चित्रपट सोडले. तर इतर सर्व स्त्रीप्रधान चित्रपटांना फारसे यश मिळालेले नाही. 'छपाक' हा देखील एक स्त्री प्रधान चित्रपट आहे. त्यामुळे बहुदा या चित्रपटाबाबत प्रेक्षक फारसे उत्साही दिसत नाहीत.

'छपाक' एक ड्रामा पॅटर्न चित्रपट आहे. तर दुसरीकडे तान्हाजी एक अॅक्शनपट आहे. अॅक्शनपटांना बॉलिवूडमध्ये नेहमीच चांगली मागणी असते. आपल्या देशातील बहुसंख्य प्रेक्षकांना झगमग गाणी, हायव्होल्टेज ड्रामा, जोरदार अॅक्शन असे मसालेदार चित्रपट पाहायला आवडतात. तान्हाजी देखील असाच एक अॅक्शन सीन्सने भरलेला ऐतिहासिकपट आहे. त्यामुळे अॅक्शन विरुद्ध ड्रामा या स्पर्धेत सध्या अॅक्शनपट बाजी मारताना दिसत आहे.

या सर्व गोष्टीचा अभ्यास केला असता कलेक्शन आणि ऑडियन्स रेटिंग यांच्यात तुलना करणे चुकीचे आहे. कारण दोन्ही चित्रपटाचे जॉनर आणि प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. दिग्दर्शित मेघना गुलजार यांनी सत्यघटनेतील रिअलिस्टीक टच कायम ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 

नवखा दिग्दर्शक ओम राऊत यांनी तानाजींचे शौर्य पडद्यावर दाखविताना ते पूर्णपणे भव्यदिव्य होईल, डोळे दिपवून टाकणारे होईल याची पुरेपूर खबरदारी घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे. 

छपाक हा चित्रपट ड्रामा पॅटर्नसोबत एका सामाजिक घटनेवर आधारित आहे.  तर तान्हाजी हा चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमिवर अधारित असला तरी  एक अॅक्शनपटदेखील आहे. नाट्यमय संहिता, पहिल्या फ्रेमपासून खिळवून ठेवणारी मांडणी, प्रभावी 'व्हीएफएक्स' यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमि असलेला 'तान्हाजी' एक उत्तम व्यावसायिक चित्रपट होतो. 

भारतीयांचा कल सामाजिक पटापेक्षा ऐतिहासिक गोष्टी उलगडण्याकडे अधिक असल्याने तान्हाजी द अनसंग वॉरियर' आणि छपाक या दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसर किती गल्ला जमवला हे पाहणे चुकीचे आहे असे म्हणायला हरकत नाही. यासोबत #BycottDeepikaPadukone या हॅशटॅगचा फारसा परिणाम छपाकच्या बॉक्स ऑफिसवर झाला असेही म्हणता येणार नाही.

हे ही वाचा►शेवंता-अण्णांच्या अतिरोमान्समध्ये रात्रीस खेळ फसला..?