Wed, Aug 12, 2020 02:38होमपेज › Soneri › २९ वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार सलमानच्या घरात 

२९ वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार सलमानच्या घरात 

Last Updated: Oct 10 2019 1:37PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या बंगल्याची देखरेख करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती सलमानच्या बंगल्याची मागील २० वर्षांपासून देखरेख करत आहे. परंतु, हा व्यक्ती मुंबई पोलिसांना हवा असलेला वॉन्टेड क्रिमिनल आहे आणि मागील २९ वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सूत्रांच्या माहितानुसार, सलमान खानच्या गोराई स्थित बंगल्याची देखरेख करणाऱ्या या व्यक्तीचे नाव शक्ती सिद्धेश्वर राणा आहे. ६२ वर्षीय हा व्यक्ती येथे काम करत असल्याची सूचना मुंबई पोलिसांना आपल्या एका गुप्तचराकडून मिळाली. मुंबई पोलिस क्राईम ब्रँचच्या युनिट ४ ने सूचना मिळाल्यानंतर सलमान खानच्या घरावर क्राईम ब्रँचने छापा टाकला.

पोलिस येताच राणाने बंगल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी बंगल्याला घेराव घातल्यामुळे तो पकडला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, राणा आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी १९९० मध्ये चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. नंतर तो जामीनावर बाहेर आला. त्यानंतर सातत्याने तो पोलिसांना चकवा देत आहे.

अनेकवेळा आदेश देऊनही राणा न्यायालयात गेला नाही, त्यानंतर मात्र त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. राणा अचानक शहरातून बेपत्ता झाला. परंतु, मुंबई पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला. पोलिसांना ज्यावेळी माहिती मिळाली की, हा गुन्हेगार ज्या बंगल्याची देखरेख करतो, तो बंगला सलमान खानचा आहे. पोलिस क्राईम ब्रँचने थेट सलमानच्या बंगल्यावर छापा मारला आणि राणाला अटक केली.