होमपेज › Soneri › अखेर दीपिकाच्या जेएनयू भेटीवर बोलल्या मेघना गुलजार

अखेर दीपिकाच्या जेएनयू भेटीवर बोलल्या मेघना गुलजार

Last Updated: Jan 14 2020 5:46PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोनला टिकेला सामोरे जावे लागले आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले. काहींनी दीपिकाचे समर्थन केले तर काहींनी तिला ट्रोल केले. दीपिकाने छपाक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही स्टंटबाजी केल्याचे ट्रोलर्स म्हणाले. तसेच 'छपाक'वर बहिष्कार घालण्याचे आवाहन अनेकांनी सोशल मीडियावरून केले. दीपिका पादुकोणच्या या निर्णयावर 'छपाक'च्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी अखेर आपले मत मांडले आहे. 

मेघना गुलजार यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, दीपिकाचा निर्णय हा तिचा वैयक्तिक होता. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमी वेगळे ठेवायला हवं. एखाद्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक जीवनात काय केले आणि एखाद्या चित्रपटात व्यावसायिक म्हणून काय केले आहे, या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहणे आवश्यक आहे. चित्रपटातील कथानकाला आणि त्यातील संदेशाला महत्त्व देणे गरजेचे आहे. 

'छपाक' आणि 'तान्हाजी : अनसंग वॉरियर' चित्रपट एकाच दिवशी १० जानेवारीला रिलीज झाले. त्यानंतर या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर फाईट दिसून आली. याबद्दल मेघना म्हणाल्या, “हा वितरण करणाऱ्यांचा निर्णय आहे जो चित्रपटाच्या वितरकाने घेतला आहे. मला असे वाटते की त्यांचा असा विश्वास आहे की दोन्ही चित्रपट खूपच भिन्न असल्याने दोन्ही चित्रपटांना त्यांचे प्रेक्षक नक्की सापडतील."