वीर शौर्याची गाथा, 'जंगजौहर'चा नवा लूक रिलीज 

Last Updated: Jul 11 2020 3:07PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' या मराठी चित्रपटाचा नवा लूक सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे आणल्यानंतर ‘जंगजौहर’च्या माध्यमातून समोर येत आहे. 

बाजीप्रभू देशपांडे हे शब्द म्हणजे निस्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतिक! पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या शिताफिने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली होती. यानंतर पाठलागावर असलेल्या विजापूरी सैन्याचा धोका लक्षात घेऊन बाजींनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. 

बाजीप्रभू आणि फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. अविस्मरणीय पराक्रमाचा हा अध्याय ‘जंगजौहर’ या ऐतिहासिक चित्रपटातून लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना आणि बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.

अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे आणि ऐतिहासिक ग्रंथाच्या संशोधनातून हा चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या तत्कालीन घराण्यांच्या वंशजाकडून अधिकृत कागदपत्रांची मदत घेण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या प्रारंभी ‘जंगजौहर’ची पहिली झलक दिसल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.