पुढारी ऑनलाईन डेस्क
ते सुंदर हास्य, निरागस चेहरा आणि मोहिनी घालणारे डोळे, या अदाकारीने सलमान खानसोबत सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यातील भाग्यश्री पटवर्धनने 'मैंने प्यार किया' (१९८९) या चित्रपटातून एन्ट्री घेतली. या चित्रपटातून सलमान खान आणि भाग्यश्रीच्या लव्ह स्टोरीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'दोस्ती की है निभानी तो पडेगी ही'...सलमान आणि भाग्यश्रीवर चित्रीत करण्यात आलेला हा डायलॉग लोकांना आवडला. या चित्रपटातील भाग्यश्रीला आणि तिच्या सौंदर्याला प्रेक्षकांनी दाद दिली. अद्यापपर्यंत सिनेरसिक तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतात.
भाग्यश्रीचा २३ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. सांगलीतील पटवर्धन शाही घराण्यात १९६९ मध्ये तिचा जन्म झाला. दूरदर्शनवरील अमोल पालेकर द्वारा निर्मित मालिका 'कच्ची धूप'मध्ये ती पहिल्यांदा दिसली. 'मैंने प्यार किया' हा तिचा सलमानसोबतचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने भाग्यश्रीला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटात अपार यश मिळाल्यानंतरदेखील तिने आपले घरसंसार सांभाळण्याचा निर्णय घेतला.
२०१४-१५ मध्ये मालिका 'लौट आओ त्रिशा' मध्ये दिसली होती. ही मालिका लोकप्रिय ठरली. त्याशिवाय २००९ मध्ये 'झलक दिखला जा' मध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली होती.
शूटिंगच्या वेळी रिलेशनमध्ये होती भाग्यश्री
भाग्यश्री पटवर्धन जेव्हा सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' चित्रपट करत होती. तेव्हा ती हिमालय दासानीसोबत डेटिंग करत होती.
भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती कंजर्वेटिव फॅमिलीतून आहे. हिमालयशी असणारी मैत्री तिच्या घरच्या मंडळींना आवडत नव्हती. त्यामुळे दोघांनी ब्रेकअप केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, यादरम्यान, हिमालय शिक्षणासाठी यूकेला गेला आणि इकडे भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया' चित्रपट साईन केला. भाग्यश्री म्हणाली होती की, 'आम्ही एकत्र नव्हतो.' परंतु, तिला विश्वास होता की, एक दिवस ते दोघे नक्की एकत्र येऊ.
भाग्यश्री-हिमालय यांच्या लग्नाला सूरज बडजात्या, सलमान खानसहित काही लोक उपस्थित होते. २१ फेब्रुवारी १९९० रोजी तिच्या मुलाचा अभिमन्यूचा जन्म झाला. तर १ जानेवारी, १९९५ रोजी मुलगी अवंतिकाचा जन्म झाला.
'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटातून अभिमन्यूने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.
'या' वयातही आहे एकदम फिट
भाग्यश्री आजही फिटनेसला तितकच महत्व देते. एकही दिवस न चुकवता व्यायाम करणे, हे तिच्या पिटनेसचे रहस्य आहे.
भाग्यश्रीच्या फिटनेसची कमाल
मीडिया रिपोर्टनुसार, जे कपडे घालायचे आहेत, ते आत्मविश्वासाने घाला, असे ती म्हणते. क्लासी आणि एलिगेंट स्टाईल तिला आवडतं. सौंदर्य वाढवण्यासाठी नेहमी हसत राहिलं पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे. मी खूप पाणी आणि दिवसांतून २-३ वेळा ग्रीन टी पिते. नाष्ता खूप गरजेचे आहे, असे ती म्हणते.
भाग्यश्री म्हणते, मी मेटाबॉलिक ट्रेनिंगमध्ये विश्वास करते. सकाळी लवकर उठून वर्कआऊटदेखील करते. माझा नाष्ता प्रोटीनयुक्त असतो. लंचमध्ये हिरव्या भाज्या, डाळ, खूप दही आणि ब्राउन राईसदेखील समाविष्ट असते. डिनरमध्येदेखील हेच पदार्थ असतात. डिनरमध्ये सूप अवश्य घेते. सायंकाळी कॉफी घेते. चीज आणि क्रीम क्रॅकर्स, टोस्ट वा भेल वगैरे स्नॅक्स म्हणून खाते.