Wed, Jan 27, 2021 09:32होमपेज › Solapur › युवकांमध्ये खा. शरद पवारांसह राष्ट्रवादीची क्रेझ का वाढली?

80 वर्षाच्या आजोबासाठी तरूणाई का सरसावली?

Last Updated: Oct 19 2019 10:31PM

तरुणाईच्या गराड्यात शरद पवारपंढरपूर : नवनाथ पोरे

सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली असून यावेळच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात मोठ्या संख्येने युवक सहभागी झालेले दिसत आहेत. 80 वर्षांचे आजोबा आणि सत्तेमुळे बदनाम झालेल्या राष्ट्रवादीची क्रेझ युवकांमध्ये अचानक का वाढली असा प्रश्‍न सामाजीक आणि राजकीय पंडितांपुढे उभा राहिला आहे.

सर्व सामान्य नागरिकांप्रमाणेच युवकांनाही निवडणूका आणि राजकारणाचे विशेष आकर्षण असते. मात्र युवकांना नव्या विचाराचे, नव्या पक्षाचे आणि नव्या  नेत्याचे आकर्षण असते. मागील 20 वर्षांचा विचार केला असता 125 वर्षे पूर्ण केलेल्या काँग्रेस आणि अनेक वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी युवकांमध्ये प्रचंड नाराजी, अनाकर्षकता दिसत होती. त्यामुळे या युवकांमध्ये नव्या विचाराच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे आणि त्यातून उदयास आलेल्या नव नेतृत्वाचे आकर्षण निर्माण झालेले होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीचा आणि त्या पक्षाच्या नेत्यांचा समाजमनावरील प्रभाव ओसरत गेला.

विशेषत: तरूणांमध्ये तर काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी प्रचंड राग भरल्याचे दिसून येत  होते. जुने पक्ष, वयोवृद्ध नेते, तेच ते सत्ताधारी चेहरे या सगळ्यांचा उबग आलेल्या तरूणाईने 2010 नंतर भाजप, शिवसेना, मनसे, या पक्षांकडे आपला मोर्चा वळवला. सोशल मिडीयावर आणि प्रत्यक्ष मतदानातही युवकांनी आपला कृतीशिल सहभाग दाखवून दिला. त्यामुळेच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पार धुरळा उडाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय चित्र बदलले असून काही नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षाचे 80 वर्षांचे वयोवृद्ध नेते खा. शरद पवार, फायरब्रँड नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवस्वराज्य मालिकेमुळे घरा-घरात पोहोचलेले खा. अमोल कोल्हे, युवक नेते रोहित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी युवकांमध्ये कमालीचे आकर्षण दिसू लागले आहे.

मागील महिन्याभरात तर संपूर्ण राज्यातील युवकांचे आयकॉन म्हणून 80 वर्षे वयाचे शरद पवार पुढे आलेले आहेत. पवारांच्या समकालीन पिढी आता सक्रिय राजकारणातून बाहेर पडलेली आहे. दुसर्‍या फळीतील नेते निस्तेज झालेले दिसत असताना 80 वर्षांच्या पवारांविषयी आजच्या 18- 20 वर्षांच्या पोरांना एवढे आकर्षण का वाटू लागले आहे  असा   प्रश्‍न सामाजिक, राजकीय विश्‍लेषकांना पडलेला आहे. पवारांच्या नेतृत्वाविषयी काही महिन्यांपूर्वी आकस दाखवणारी युवा पिढी आता मात्र पवारांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी उतावीळ झालेली आहे. उन,पाऊस, वारा  याची तमा  न बाळगता युवा पिढी पवारांची वाट पाहत आहे. त्यांच्या सभांना, त्यांच्या भाषणांना टाळ्या, शिट्ट्यांचा तुफान प्रतिसाद देत आहे. आणि सोशल  मिडीयावर पवारांविषयी रकानेच्या रकाने लिहीले जात आहेत. व्हॉटस अ‍ॅपवर डि.पी. आणि स्टेटस्वर पवारांचे फोटो ठेवत आहेत.  त्यांनी केलेल्या विकास कामांना युवकच उजाळा देत आहेत.

या सगळ्या घटना आणि घडामोडीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय परिस्थीतीमध्ये होत असल्याचे दिसते. वडील जरी वेगळ्या पक्षात असला तरी पोरगं मात्र राष्ट्रवादीचा झेंडा गाडीला लावून फिरताना दिसत आहे. हा बदल एवढ्या अनपेक्षीतपणे का झाला, कसा काय झाला याबाबत विश्‍लेषण केले जात आहे. सध्याची निवडणूक दोन महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटत असतानाच राष्ट्रवादीविषयी आणि शरद पवारांविषयी युवकांनी दाखवलेली प्रचंड सकारात्मकता पाहता राष्ट्रवादी पुन्हा निवडणूकीत ऊसळून येत असल्याचे दिसत आहे.