Fri, Dec 04, 2020 04:14होमपेज › Solapur › नवविवाहितेचा खून करून मृतदेह जाळला

नवविवाहितेचा खून करून मृतदेह जाळला

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:54PM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी  

प्रेमविवाह मान्य नसल्याच्या कारणावरून 19 वर्षीय नवविवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह घराच्या मागे जाळण्यात आल्याची घटना येवती (ता. मोहोळ) येथे लेंडवे वस्तीवर शनिवार (दि.9) रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

रेखा श्रीकृष्ण लेंडवे (वय 19) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सासू, सासरा व दीर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष औदुंबर लेंडवे (सासरा), जनाबाई सुभाष लेंडवे (सासू) व प्रशांत सुभाष लेंडवे (तिघे रा. येवती ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पोलिसांनी  त्यांना अटक केली आहे. 

श्रीकृष्ण हा रेखाचा नात्याने मावस भाऊ आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी श्रीकृष्ण रेखाला घरी घेऊन जातो, असे सांगून तिला घेऊन गेला व त्यानंतर त्या दोघांनी विवाह केला. विवाह केल्याचे फोटो व्हॉटस् अ‍ॅपवरून जमदाडे कुटुंबाला पाठवले. परंतु, हा विवाह लेंडवे कुटुंबातील रेखाचा सासरा, सासू व दीर यांना मान्य नव्हता. त्यामुळे ते रेखावर चिडून होते. त्यांनी याच कारणामुळे रेखाला संपविण्याचा बेत आखला. शनिवारी पहाटे रेखाच्या सासू, सासरे व दीर यांनी तिचे हात पाय तारेने बांधून तिला गळफास दिला. तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह वस्तीच्या मागे नांगरटीत जाळून टाकला. नंतर रेखाच्या वडिलांना फोन करून तुमच्या पोरीने स्वतः गळफास घेतल्याचे सांगितले. याबाबत मुलीचे वडील रघुनाथ रावसाहेब जमदाडे (वय 51, रा. येळवी, ता. जत, जि. सांगली) यांनी मोहोळ पोलिसांत वरील तिघांविरोधात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब जाधव हे करीत आहेत.