Wed, Aug 12, 2020 21:36होमपेज › Solapur › उजनीत दौंडचा विसर्ग वाढला

उजनीत दौंडचा विसर्ग वाढला

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 9:58PMबेंबळे :   सिध्देश्‍वर शिंदे 

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाच्या टक्केवारीचा काटा गेले दोन-तीन दिवस मंदावला होता. वरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला होता. त्यामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणार्‍या पाण्यात मोठी घट झाली होती; मात्र पुन्हा पावसास प्रारंभ झाल्यानेे उजनीवरील सात धरणांतून 13  हजार 423 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान, वडज धरणातून 361 क्युसेक, येडगाव धरणातून 2 हजार 46 क्युसेक, कलमोडी 560, चासकमान 5 हजार, वडिवले 970, कासारसाई 200, तर खडकवासला धरणातून 4 हजार 286 असे पाणी नदीपात्रात सोडले आहे. 

त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  दौंड येथून उजनीत येणार्‍या विसर्गात वाढ होऊ लागली आहे. याअगोदर दोन दिवस केवळ 6 हजार 286 क्युसेकने येणार्‍या विसर्गात वाढ होऊन आज सकाळपासून 20175 क्युसेकने पाणी येऊ लागली. त्यात दुपारनंतर वाढ होत तो 26 हजार 113 क्युसेक झाला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्थिर झालेल्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी दुपारपर्यंत उजनी धरणात सध्या 23.35 टक्के पाणीसाठा होत आला आहे.वीर धरणातून नीरा नदीत 13 हजार 662 क्युसेकचा विसर्ग चालू केला असून तो लवकरच नीरा नरसिंहपूरमध्ये भीमा नदीत दाखल होणार असल्याने भीमा नदीत पाणीपातळी वाढणार आहे.सध्या उजनी धरणाच्या वरील बाजूला असलेल्या 19 धरणांपैकी 11 धरणांतील पाणीसाठा 90 ते 100 टक्क्यांपर्यंत झाला आहे.

उजनी धरणात यावर्षी जो पाणीसाठा झाला तो टप्प्याटप्प्याने झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनच्या पहिल्या  आठवड्यात पावसाने पहिला टप्पा पूर्ण केला.16 जुलैला उजनी प्लसमध्ये आले. सलग 19 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला. त्यानंतर तीन-चार दिवस दौंड येथून धरणात येणारा विसर्ग घटत गेला. परत वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केल्याने  बंडगार्डन व दौंड येथून येणार्‍या विसर्गात वाढ होत आहे. एक वेळ दौंड येथून 66000 क्युसेकचा विसर्ग येत होता. त्यात टप्प्याटप्प्याने घट होत तो  6286 क्युसेक झाला होता. पुन्हा त्यात वाढ होऊ लागल्याने उजनीत संथगतीने होणारा पाणीसाठा जलद होणार आहे.