Fri, Jul 10, 2020 00:09होमपेज › Solapur › उजनी तळालाच; जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

उजनी तळालाच; जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

Published On: Jul 24 2019 4:58PM | Last Updated: Jul 24 2019 4:46PM
सिध्देश्वर शिंदे : बेंबळे  (सोलापूर) 

चार महिने देशात पावसाळ्याचा हंगाम असतो. यापैकी ५५ दिवस म्हणजे दीड महिन्यांपेक्षा जास्त पावसाचे दिवस लोटले आहेत. आता उरलेल्या अडीच महिन्यात सरासरीइतका पाऊस आला नाही, तर सोलापुरातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. अशातच जिल्हावासियांचे आशास्थान असलेले उजनी धरण ऐन पावसाळ्यात अजून तळाशी असल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

जून अखेरचा व जुलैच्या पहिल्या आठवड्यात उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीने उणे ५९.८८ टक्के ते मायनस २६ टक्के अशी प्लसकडे वाटचाल सुरू होती. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने भिमा पात्रातील धरणांमधून येणारा विसर्ग कमी झाला आहे. परिणामी उजनीच्या पाणीसाठ्यातही संथगतीने वाढ होत आहे.

पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याचा साठा याबाबत सर्वात विदारक स्थिती सोलापूरची बनली आहे. उजनी धरणात सध्या मायनस 26 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 49 टक्के  कमी आहे. याच कारणाने उजनी धरणातुन सोलापूर व जिल्ह्यातील अनेक गावांसाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास उजनी प्रशासनाकडुन नकार देण्यात आला. भीमा नदी पुर्ण कोरडी पडली असुन नदीकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. आषाढीला भीमा नदीत पाणी सोडण्याचा अलिखित नियम अगोदर मोडला असून त्यानंतर उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकरी व गावकरी यांच्यात संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यात यंदा पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले असले तरी जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, जनावरांना चारा नाही, हाती पीक नाही, अशी बिकट स्थिती झाली आहे. जिल्ह्यात खरीपाचा हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी सोयाबीन, मुग, उडीद, कापूस आणि काही प्रमाणात ऊसाची लागवड करतो. यावेळी देखील पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांजवळ असेल ते विकून पेरण्या केल्या. पण अवेळी पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे.

सध्यस्थितीतील उजनी धरणाची पाणीपातळी 

एकूण पाणीपातळी ...४८८.७३० मी.
एकूण पाणीसाठा ...१३९४.७९ दलघमी 
उपयुक्त पाणीसाठा.. उणे ४०३.२१ दलघमी 
टक्केवारी ...-२६.९१%

विसर्ग ..

दौंड ..१९७७ क्युसेक 
बंडगार्डन .. १४५८ क्युसेक