Thu, Aug 13, 2020 17:08होमपेज › Solapur › महिला टीटींनी केली वेडसर महिलेची प्रसूती

महिला टीटींनी केली वेडसर महिलेची प्रसूती

Published On: Dec 01 2017 7:29PM | Last Updated: Dec 01 2017 7:28PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर रेल्वेस्थानकावर बाहेरील बाजूस एक वेडसर महिला प्रसूतीकळांनी मदतीची याचना करत होती. परंतु अंगावरील घाणेरडे कपडे पाहून एका भिकारी महिलेच्या मदतीला कोणच येत नव्हते. तितक्यात महिला टीटी प्रिती भोसले व लुर्डस् डेल या दुपारच्या जेवणासाठी जात होत्या. त्या वेडसर महिलेल्या माणुसकीचा हात देत तिची खरी परिस्थिती जाणून घेतली व तिची नैसर्गिक प्रसूती केली. परंतु माणुसकी हरवलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेत राहणे पसंत केले.

सोलापूर रेल्वेस्थानकावर दुपारी एक वेडसर महिला अचानक जोर जोरात किंचाळत होती. काही तरुणांनी तिला विचारण्याच्या प्रयत्न केला. परंतु ती वेडसर महिला प्रसूतीकळांनी अधिकच बिथरली होती. काही जणांनी तर बघ्याची भूमिका घेणे पसंत केले. काही महिला आल्या, परंतु त्यांना तिचे खरे दुखणे समजत नव्हते.तितक्यात प्रिती भोसले व लुर्डस् डेल या महिला टीटी जात होत्या. त्यांचे लक्ष या वेडसर महिलेच्या आर्त हाकेकडे गेले.

दोन्ही टीटी महिला धावून गेल्या. काय होतयं तुला बाई, काय त्रास होतोय, असे प्रश्‍न विचारले.परंतु ती वेडसर असल्याने तिला काहीच कळत नव्हते. त्यांचे लक्ष त्या महिलेच्या पोटाकडे गेले. पोटासमोर भलं मोठं बोचकं असल्याने ती गर्भवती आहे, ही बाब कळत नव्हती. त्या महिला टीटींच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलांना आडोशा  करण्यास सांगितले. काही वेळातच त्या महिलेने नैसर्गिकरित्या गोंडस मुलाला जन्म दिला. काही नागरिकांनी 108 ह्या रुग्णवाहिकेस फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु 108 या रुग्णवाहिकेने फोनच उचलला नाही, असे रेल्वेस्थानकावरील नागरिक  संताप व्यक्त करीत असताना सांगत होते. महिला वेडसर असल्याने तिचे नाव व पत्ता सांगू शकली नाही.तर त्या मुलाचा बाप कोण आहे, हे सुध्दा त्या वेडसर महिलेला माहित नाही. नराधमांनी तर कळसच साधलायं एका वेडसर महिलेलादेखील गर्भवती होण्यास भाग पाडले.