Thu, Sep 24, 2020 17:06होमपेज › Solapur › चार वाहने अडवून 8 लाखांची लूट

चार वाहने अडवून 8 लाखांची लूट

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:24PM

बुकमार्क करा
कुर्डुवाडी : प्रतिनिधी

कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरून जात असलेल्या 4 वेगवेगळ्या वाहनांना अडवून सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. ही प्रवासी वाहने मराठवाड्यातून पुण्याकडे जात होती. 

कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर रिधोरे गावानजीक आरडा पूल आहे. या पुलावर गतिरोधकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे गाड्यांचा वेग कमी होतो. याचवेळी तेथे लपून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी गाड्यांचा  दरवाजा उघडून ही चोरी केली आहे. काही मिनिटांच्या अंतरात 4 गाड्या या दोन चोरांनी लुटल्या. यामधील एक जण सडपातळ, तर दुसरा जाड असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. 

मध्यरात्री अंबाजोगाईचे डॉ. सुधीर भास्करराव धर्मपत्रे हे पुण्याकडे निघाले होते. पहाटे 4 च्या सुमारास ते रिधोरे गावाजवळ आल्यानंतर दोन चोरट्यांनी त्यांची गाडी अडवून डिकी उघडली व चार बॅगा पळवल्या. यामध्ये रोख रक्‍कम, कागदपत्रे आहेत. 50 हजार रुपयांचा मुद्देमाल गेल्याची तक्रार धर्मपत्रे यांनी दाखल केली आहे. 

दुसरी तक्रार चालक राजाभाऊ दत्तू कोंडकरी (रा. माकडीचे उपळे, ता. उस्मानाबाद) यांनी दिली आहे. ते 30 प्रवाशांना घेऊन पुण्याकडे पहाटे साडेसहा वाजता जाताना गाडीचा वेग कमी झाला असता, ती अडवून  डिकी उघडून त्यामधून राहुल सरवदे यांचे रोख 2 हजार रुपये, सुजित आगळे यांचे रोख 4 हजार रु. व एक तोळे सोने, 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल व अंकित तिवारी यांचा 25 हजार रुपयांचा लॅपटॉप असा 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याच ठिकाणी तिसरी घटना तासाभराच्या अंतराने घडली आहे. अशोक महादेव तळेकर (रा. धायरी, पुणे) यांच्या गाडीचा मागील दरवाजा उघडून संजीवनी लिंबाजी चव्हाण यांच्या दोन बॅगा हिसकावून घेतल्या. यामध्ये दीड लाख रुपये किंमतीचा अंगठी, बोरमाळ, गंठण, सोन्याचे दागिने व मोबाईल आदी ऐवज होता. राधा सुरेश वाघमारे यांच्या बॅगेतील रोख 20 हजार रुपये तसेच 1 ग्रॅम नथ हा ऐवज होता. 

याच दरम्यान मागून आलेल्या अजिज ट्रॅव्हल्समधून आण्णा चव्हाण यांची बॅग लुटून नेली. या बॅगमध्ये रोख 3 हजार रुपये, 3 हजार रुपये किंमतीचा रु.चा मोबाईल, रफिक शेख यांच्या बॅगेतील रोख 18 हजार रुपये, हाजी मुक्तार शेख यांच्या बॅगेतील सोन्याचे 25 हजारांचे दागिने असा एकूण 2 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लुटला. 

दरम्यान, पहाटे साडेपाच वाजता छाया प्रमोद बाजीतखाने (रा. रंगवार गल्ली, उदगीर) ह्या महिलेच्या अल्टो गाडीचा मागील दरवाजा बळजबरीने उघडून हातातील पिशवी ओढून घेतली. या पिशवीत 3 तोळ्यांचे गंठण, पाटल्या, लॉकेट, नेकलेस, अंगठ्या असा 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज व रोख 50 हजार रु. असा 4 लाख 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.