Mon, Nov 30, 2020 13:18होमपेज › Solapur › राज्य शासन आर्थिक संकटात

राज्य शासन आर्थिक संकटात

Last Updated: Nov 22 2020 10:52PM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा    

कोरोनामुळे अनेक गोष्टींवर विपरीत परिणाम झाला असून, त्याचा फटका राज्याच्या आर्थिक स्थितीलाही बसला आहे. त्यामुळे वीज बिल माफीसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. सविस्तर चर्चेअंती सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे रविवारी दिले. 

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे सोलापूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या कोरोना संकटामुळे राज्य शासन आर्थिक अडचणीत सापडले असून जवळपास साडेबारा हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून शासकीय कर्मचार्‍यांचा पगार देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वीज बिल माफीसंदर्भात घाईघाईने निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे वीज बिलांसंदर्भात चर्चेअंती सकारात्मक निर्णय घेऊ. कर्जमाफी करताना नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनाही 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, सध्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करता ते अनुदानही रखडले आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली तर या सर्व गोष्टी शक्य असल्याची कबुली त्यांनी दिली.

राज्य शासनावर सातत्याने संकटे येत आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला असतानाच पुन्हा अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने मोठी आर्थिक मदत शेतकर्‍यांना जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे. या अतिवृष्टीमुळे आणि झालेल्या नुकसानीमुळे 

पुन्हा राज्य शासनाच्या तिजोरीवर बोजा पडला आहे. त्यात वीज बिल माफ करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे यावर राज्य शासन आणि मंत्रिमंडळ सध्या विचार करत आहे. मात्र विचारांती सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करुनच निर्णय घेऊ, असे सांगून या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला.

मागील भाजप सरकारने अनेक चुकीची धोरण राबविली. त्याचा त्रास होत आहे. ज्या पदवीधर मतदारसंघात भाजपने दोन वेळा प्रतिनिधीत्व केले त्यांनी जिल्ह्यातील पदवीधरांसाठी काय काम केले, हे आता मतदारांनी त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, आवाहनही त्यांनी केले.