Wed, Aug 12, 2020 19:52होमपेज › Solapur › शहर व जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

शहर व जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी 

गेल्या तब्बल दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने पंधरा ऑगस्ट आणि नागपंचमीच्या मुहुर्तावर पुन्हा पुनरागमन केले आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे.  काही भागांत काल दाखल झालेला  पाऊस गुरुवारी 12 ते 1 वाजेपर्यंत सुरुच होता.

 पावसाळ्याच्या सुुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पावसाळा चांगला होणार या आनंदात शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली होती. सोलापूर जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र 75 हजार हेक्टर असले तरी यंदा जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र त्यांनतर तब्बल दीड महिना पावसाने सोलापूर जिल्ह्यातून दडी मारली होती. त्यामुळे हाता-तोंडाला आलेला खरीप हंगाम शेवटच्या घटका मोजत होता. या पार्श्‍वभूमीवर पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागून राहिले होते. खरिपातील उडीद, मूग शेवटच्या टप्प्यात असला तरी या पावसामुळे तूर, भुईमूग, सूर्यफुल या पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

संपूर्णच खरीप हातातून जाण्यापेक्षा काहीअंशी शेतकर्‍यांच्या हाती लागेल, अशी शक्यता आता या पावसामुळे निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आश्‍लेषा नक्षत्राने पावसाची हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी सोलापूर शहर व जिल्ह्यात दाखल झालेला हा पाऊस गुरुवारी दुपारपर्यंत सुरुच होता. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी, माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील अनेक भागांत हा पाऊस सुरु होता. यामुळे शेतातून पाणी वाहात नसले तरी जमिनीत पाणी मुरविण्यासाठी हा भिज पाऊस शेतकर्‍यांना लाभदायक ठरणार आहे. शहरात सलग आठ तास पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जनजीवन काहीअंशी विस्कळीत झाले होते. सकाळी कामधंद्यासाठी आणि शाळेसाठी घराबाहेबर पडणार्‍या कामगारवर्गाची आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. पावसाची रिमझिम सतत सुरु असल्याने शेतीची कामेही खोळंबून पडली होती. शहरातील सकल भागात पाणी साचले होते.