Sat, Sep 19, 2020 11:50होमपेज › Solapur › स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी डंकेंची मनपा झोन एकवर नियुक्ती

स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी डंकेंची मनपा झोन एकवर नियुक्ती

Last Updated: Sep 17 2020 2:15AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

स्मार्ट सिटी कंपनीकडे तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले महापालिकेचे कनिष्ठ अभियंता तपन डंके यांची पालिकेच्या विभागीय कार्यालय एकचे अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशान्वये ही कार्यवाही झाली आहे. डंके यांची नुकतीच पदोन्नती झाल्याने त्यांना ही नियुक्ती मिळाली आहे.

सोलापूर शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शेकडो कोटींची कामे सुरू आहेत. शहरात शंभर कोटींचे रस्ते, 200 कोटींच्या ड्रेनेजलाईन्स टाकण्याचे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त अनेक कामे 
प्रगतीपथावर आहेत. या कामांवर देखरेखीसाठी तांत्रिक अधिकारी  म्हणून महापालिकेचे कनिष्ठ अभियंता तपन डंके यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, डंके यांची ऑगस्ट महिन्यात सहायक अभियंता या पदावर पदोन्नती झाली होती. 

महापालिका विभागीय कार्यालय एकचे अधिकारी सध्या आजारी असल्याने झोन एक अधिकारी या रिक्त पदावर डंके यांची नियुक्ती आयुक्त शिवशंकर यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या शेकडो कोटींच्या कामावर देखरेखीची जबाबदारी आता स्मार्ट सिटीचीच असणार आहे. स्मार्ट सिटीसाठी नियुक्त कन्सलटंटना कोट्यवधी रुपयांचे शुल्क दिले जात असतानाही कामांवरील देखरेखीसाठी महापालिकेचे अधिकारी काम करत होते.

महापालिकेतील बदल्या पुन्हा रखडल्या

वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच टेबलवर कार्यरत असलेल्या महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे सध्या क्वारंटाईन असल्यामुळे बदल्यांची प्रक्रिया रखडली असण्याची शक्यता आहे. कारण, महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात पालिकेतील तांत्रिक विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आणि दुसर्‍या टप्प्यात नॉन टेक्निकल अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार होत्या. आयुक्त क्वारंटाईनमुक्त झाल्यानंतर बदल्या होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 "