उत्तर तालुका : (प्रतिनिधी)
‘हर्रऽऽ बोला हर्रऽऽ’चा गजर... ‘सिद्धेश्वर महाराज की जय’चा गगनभेदी अखंड जयघोष... साथीला पारंपरिक वाद्यांचा निनाद... पांढरीशुभ्र बाराबंदी परिधान केलेल्या सेवेकर्यांची एकच गर्दी... आकाशाला गवसणी घालणारे मानाचे सोनेरी डौलणारे आकर्षक सात नंदीध्वज... अशा अत्यंत उत्साही आणि तितक्याच भक्तीमय वातावरणात सोमवारी श्री सिद्धेेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना ( यण्णीमज्जन) तैलाभिषेक करण्यात आला अन् सोमवारी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अभूतपूर्व अशा यात्रेला खर्याअर्थाने प्रारंभ झाला.
हार, खोबरे, खारीक हार यांनी सजवलेले नंदीध्वज, पुढे भक्तांच्या डोक्यावर तैलाभिषेक घालण्यासाठी काळ्या रंगाच्या मातीच्या घागरी, घोडे, उंट, बग्गी, हलगीचा कडकडाट आदी लवाजम्यासह सकाळी साडेआठ वाजता मल्लिकार्जुन मंदिरजवळील मानकरी राजशेखर हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांच्या मोठ्या भक्तीमय वातावरणात मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यामध्ये मानकरी सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या व दुसर्या नंदीध्वजांची पूजा मानकरी देशमुख यांनी दोन काठ्यांसह इतर मानाच्या पाच काठ्यांचे मानकर्यांच्या हस्ते धार्मिक विधीने भक्तीभावात पूजन झाले. त्यानंतर नंदीध्वज मोठ्या भक्तीभावात हिरेहब्बू वाड्यापासून 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले. सोलापूर शहरात भक्तीचा महापूर आल्याचा प्रत्यय शहरवासीयांना आला.
सिद्धेश्वरांची चांदीची मूर्ती ठेवलेली पालखी, संपूर्ण सोलापूर व पंचक्रोशीतील सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सातही नंदीध्वज बाळी वेस, माणिक चौक, विजापूर वेस या मार्गावरून सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सिद्धेश्वर प्रशालेसमोर कलेक्टर ऑफिसजवळ मानाचे सात नंदीध्वज एकत्र आल्यावर सरकारी आहेर मानकरी हिरेहब्बू यांना देशमुख यांच्यावतीने करण्यात आला. हा मान ब्रिटिशकाळापासून आजही सुरू आहे. तेथून हे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात 68 लिंगांपैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबले. तिथेच हिरेहब्बू व शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधिवत पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्याठिकाणी शेटे यांनी हिरेहब्बू यांना विडा दिला व नंतर देशमुख, कळके, बहिरोपाटील, भोगडे, थोबडे, सिद्धय्या स्वामी, मल्लिनाथ जोडभावी, दर्गोपाटील, शिवशेट्टी, गवसने, इटाणे (पूजेचे मानकरी, झोळीवाले मानकरी) यांना विड्याचा मान मानकरी हिरेहब्बू बंधूंनी दिला. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गदगीचे मानकरी हिरेहब्बू यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर 68 लिंगांना तैलाभिषेकास (यण्णीमज्जन) सुरुवात झाली. त्यानंतर नंदीध्वज नियोजित मार्गाने सिद्धेश्वर मंदिरात जाऊन सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन विसावले. तेथून दुपारी पुन्हा नंदीध्वज मिरवणुकीस सुरूवात झाली. ही मिरवणूक डफरीन चौक, महापौर बंगला, रेल्वे स्टेशन, जुनी कंपाऊंड मिल, एस.टी. स्टँड परिसर, सम्राट चौकमार्गे निघाली. 68 लिंगांना तैलाभिषेक करून व प्रदक्षिणा घालून रात्री नऊ वाजता हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वज परत आले.
मिरवणुकीदरम्यान भाविकांनी जागोजागी रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळी काढली होती. पालखी आणि नंदीध्वजांचे जागोजागी पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी व नंदीध्वजाचे आशीर्वाद घेण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांकडून ठिकठिकाणी बाराबंदी परिधान केलेल्यांना व भक्तांना पाणी, चहा, दूध, केळी फळांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यामध्ये चप्पल न घालता मानकरी, भक्त, सेवेकरी 68 लिंग तैलाभिषेक दर्शन करण्यासाठी पायी चालत होते. यावेळी संजय भोगडे हे यात्रेतील सर्व भक्तांना कपाळी गंध लावत होते. मिरवणुकीदरम्यान पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता. वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल करण्यात आले होते. या 68 लिंग तैलाभिषेक व नंदीध्वज पूजनावेळी मानकरी राजशेखर हिरेहब्बू, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, मंदिर समिती अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रकाश वाले, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, सिध्दाराम चाकोते, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, ‘मनपा’ आयुक्त दीपक तावरे, सुभाष मुनाळे, राजशेखर शिवदारे, अॅड. मिलिंद थोबडे, केदार उंबरजे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, आनंद चंदनशिवे आदींसह मानकरी, भक्त, सेवेकरी उपस्थित होते.