Sat, Jul 11, 2020 13:56होमपेज › Solapur › महापौरपदासाठी यन्‍नम-कारभारीत चुरस

महापौरपदासाठी यन्‍नम-कारभारीत चुरस

Last Updated: Nov 17 2019 1:24AM
सोलापूर : प्रशांत माने

सोलापूरच्या महापौरपदी सत्ताधारी भाजपकडून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच श्रीकांचना यन्‍नम आणि कल्पना कारभारी यांच्यात महापौर होण्यावरून चुुरस लागण्याची शक्यता आहे. 

चर्चेत असलेल्या अंबिका पाटील या ‘खुला’ प्रभागातून निवडून आल्या आहेत, तर राजश्री कणके या स्थायी सभापतीच्या दावेदार असून त्याचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. भाजपचे श्रेष्ठी कोणाच्या गळ्यात माळ घालतात याची उत्सुकता आहे. फेबु्रवारी 2017 मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन भाजपची जवळपास बहुमतात सत्ता आली. 

भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान शोभा बनशेट्टी यांना मिळाला. महापौर बनशेट्टी यांची मुदत संपत आल्याने नव्या महापौर निवडीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 7 डिसेंबर 2019 रोजी महापौर बनशेट्टी यांची मुदत संपत आहे. आगामी महापौरपदाचे आरक्षण ‘ओबीसी महिला’ असे राखीव झाले आहे. भाजपमध्ये ‘ओबीसी महिला’ नगरसेविका अधिक असल्याने महापौरपदी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा रंगली आहे.

गतवेळी महापौर नियुक्‍ती करताना विद्यमान महापौर बनशेट्टी आणि पक्षाकडे मजबूत दावेदारी असलेल्या श्रीकांचना यन्नम यांच्यात रस्सीखेच झाली होती. भाजप नगरसेवकांमध्ये माजी मंत्री सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख असे गट पडल्यामुळे महापौर व इतर पदाधिकारी निवडी त्यावेळी मोठ्या रंगतदार झाल्या होत्या. सुभाष देशमुख गटाच्या बनशेट्टी महापौर झाल्याने विजयकुमार देशमुख गटाच्या यन्नम यांचे नाव मागे पडले होते. आता ‘ओबीसी महिला’ आरक्षण पडल्यामुळे श्रीकांचना यन्नम यांची दावेदारी मजबूत झाली आहे. यन्नम या पद्मशाली समाजातील असून विधानसभा निवडणुकीत भाजपने पद्मशाली समाजाला संधी न देता अन्याय केल्याची भावना समाजात होती. पण आता महापौरपद यन्नम यांना देऊन न्याय द्यावा, अशी मागणी समाजातून होत आहे.

महापालिकेतील 49 नगरसेवकांमध्ये पडलेल्या गटा-तटाच्या राजकारणात 35 नगरसेवक विजयकुमार देशमुख, तर 14 नगरसेवक सुभाष देशमुख गटाकडे असल्याचे बोलले जाते. विजयकुमार देशमुख गटाच्या यन्नम महापौर होण्यात कोणतीही अडचण नाही. कारण सुभाष देशमुख गटाचे श्रीनिवास करली यांना सभागृहनेते पदावर संधी मिळाली आहे. आता विजयकुमार देशमुख काय भूमिका घेतात आणि भाजपचे श्रेष्ठी काय निर्णय देतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे. पालकमंत्री गटाच्या अंबिका पाटील आणि राजश्री कणके यांची नावे चर्चेत होती. पण आंबिका पाटील ‘ओबीसी’ असल्या तरी त्या खुल्या प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘ओबीसी’ राखीव महापौरपदावर विराजमान होता येते की नाही, हे कायद्यातील तरतूद पाहूनच निश्‍चित करता येणार आहे.

राजश्री कणके यांना स्थायी सभापतीपदाने हुलकावणी दिली असल्याने त्यांना महापौर करतील, अशी चर्चा होती. पण कणके यांना स्थायी सभापतीसाठी संधी दिली आहे. तो वाद न्यायप्रविष्ठ असून निकाल कधीही लागू शकतो, असेही काही जाणकार सांगत आहेत.

श्रीकांचना यन्नम यांना महापौरपदाची संधी मिळण्यात अडचण नसली तरी त्या महापौर झाल्यास महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, महिला व बालकल्याण सभापती या सर्व पदांवरील नगरसेवक पद्मशाली समाजाचे होत असल्याचीही चर्चा सुरू आहे. विद्यमान उपमहापौर शशिकला बत्तुलदेखील पद्मशाली समाजायीलच आहेत. पालिकेच्या सर्व कॅबिनेटने पद्मशाली हा फॅक्टर बाजूला ठेवला तर यन्नम महापौर होण्याची दाट शक्यता आहे.