होमपेज › Solapur › नोकरीच्या आमिषाने फसवणूक; तिघांवर गुन्हा

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; तिघांवर गुन्हा

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 11:04PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सिमेंट कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बँक खात्यामध्ये 37 हजार 499 रुपये भरण्यास लावून फसवणूक करणार्‍या तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय शरणप्पा कनकुरे (वय 48, रा. भवानी पेठ, मड्डी वस्ती) यांच्या फिर्यादीवरुन राहुल, अजयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा (संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाहीत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय कनकुरे यांच्या मोबाईलवर फोन करून राहुल, अजयकुमार व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अंबुजा सिमेंट, मुंबई आणि अल्ट्राटेक सिमेंट, चंद्रपूर येथे नोकरी लावतो असे सांगून कनकुरे यांच्याकडून पेटीएमने व बँक खात्यातून वेळोवेळी 37 हजार 499 रुपये भरण्यास लावले. पैसे भरल्यानंतरही नोकरी लागत नसल्याचे पाहून कनकुरे यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक नागेश मात्रे तपास करीत आहेत.

शास्त्रीनगरात 25 हजारांची चोरी

शास्त्रीनगर परिसरातील अन्सारी चौकात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात येऊन 25 हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही चोरीची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत महेबूब नबीलाल कोतकुंडे (वय 42, रा. शास्त्रीनगर, अन्सारी चौक) यांच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेबूब कोतकुंडे यांच्या घराचा घराचा दरवाजा उघडून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर कशानेतरी उचकटून सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असा 24 हजार 725 रुपयांचा ऐवज चोरून नेला म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.

विवाहितेची मुलासह आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

विवाहितेने सहा महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैपन जहांगीर शेख (वय 37, रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून रियाज सत्तार मंद्रुपकर, सत्तार महिबूब मंद्रुपकर, बानो सत्तार मंद्रुपकर (रा. हत्तुरगाव, सोलापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करिना रियाज मंद्रुपकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

रियाज व करिना यांचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर करिना हिने माहेरून पैसे आणावेत म्हणून तिला पती रियाज, सासरे सत्तार व सासू बानो हे तिघे मिळून मारहाण करून त्रास देत होते. त्या त्रासास कंटाळून करिना हिने मुलगा अबुजैद (वय 6 महिने) याच्यासह हत्तुर येथील बिटे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येसस पती, सासू व सासरे हेच जबाबदार असल्याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक उशिरे तपास करीत आहेत.