Thu, Jul 09, 2020 22:00होमपेज › Solapur › भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला 

भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला 

Last Updated: Oct 26 2019 7:56PM
सोलापूर : प्रतिनिधी 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस (भारतीय अभियांत्रिकी सेवा) परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. हर्षलने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले. लोकसेवा आयोगाने शुक्रवारी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा नावलौकिक केला. 

२०१८ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुलाखतीचा टप्पा पार पडला. या परीक्षेतंर्गत ५११ जागा रिक्त होत्या . त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या १६१, यंत्र अभियांत्रिकीच्या १३६ , विद्युतच्या १०८, अणू विद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या १०६ जागा रिक्त होत्या. 

पाच वर्षाचा असतानाच हर्षलच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे हर्षलचे शालेय शिक्षण झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत नववी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. बीड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल येथे डिप्लोमा तर कराड येथील गव्हर्नमेंट कॉलेज येथे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन राजीनामा दिला. त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन पुणे येथे हर्षलची निवड झाली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअर सर्व्हिसेसची पूर्व जानेवारी महिन्यात तर त्यानंतर मुख्य परीक्षा जून महिन्यात दिली. नंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती पार पडल्या. शुक्रवारी २५ ऑकटोम्बर रोजी निकाल जाहीर झाला. ज्यामध्ये हर्षल भोसले यांने देशात प्रथम क्रमांक पटकावला.